भाजपाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांना आज मुंबईच्या पावसाचा फटका बसला. मुंबईच्या पाण्यातून वाट काढत त्यांना हातात बूट घेऊन पायपीट करावी लागली. त्यांचा आणि  भाजपाचे महाराष्ट्रातील प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुंबईकरांना दररोज ऑफिस गाठताना पावसाचा, ट्रेन खोळंबा यांचा फटका मुंबईकरांना बसतो. भाजपाचे प्रवक्तेही यातून सुटलेले नाही. भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरचे प्रवक्ते संबीत पात्रा यांची मुंबईत पत्रकार परिषद होणार होती. मात्र मुसळधार पावसामुळे ती पत्रकार परिषदही रद्द झाली. त्यानंतर संबीत पात्रा यांना पावसातून वाट काढत बूट हातात घेऊन पायपीट करावी लागली. दादर भागातील हा फोटो आहे. भाजपाचे केशव उपाध्ये हेदेखील संबीत पात्रा यांच्यासोबत या फोटोत दिसत आहेत.

दरम्यान मुंबई मुसळधार पावसाच्या सरी सुरुच असून याचा फटका मंगळवारी सकाळी तिन्ही लोकल मार्गांना बसला आहे. नालासोपारा – विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साठल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वसई रोड – विरार दरम्यानची वाहतूक ठप्प असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सायनजवळ रूळांमध्ये पाणी साचल्यानं लोकल गाड्या कूर्मगतीनं धावत असून कुर्ला ते दादर या प्रवासास तब्बल एक ते दीड तास लागत आहे. सायन, माटुंगा या स्टेशन्स दरम्यान साठलेले पाणी पंपांच्या सहाय्यांने काढले जाते आहे. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणी वारंवार साठत असल्याचीही माहिती समोर आली आहे. अशाच मुसळधार पावसातून भाजपाच्या प्रवक्त्यांनीही वाट काढावी लागल्याचे आज दिसून आले.