मुंबईतील प्रभाव वाढवण्यासाठी दहीहंडी, गणेशोत्सवाचा आधार;
शिवसेनेचे नेते विविध योजनांचे नारळ फोडण्यात मग्न
गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबई महापालिकेच्या गडाला आगामी निवडणुकीत सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार तयार चालवली आहे. यासाठी पक्षातर्फे उत्सवांचा आधार घेण्यात येत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव मंडळांची जोरदार बाजू घेत तसेच स्वातंत्र्यदिनी तिरंगा यात्रा भरवत मुंबईत आपला प्रभाव वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि अन्य पक्षांचे नेते पालिकेच्या नव्या योजनांच्या उद्घाटनांचे नारळ फोडण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
वेगवेगळे विषय घेत भाजप रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवून देत आहे. नुकतीच काश्मीर प्रश्नावरून मुंबईत तिरंगा यात्रा काढण्याची संधी भाजपने साधली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून विमानतळानजीकच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून भाजपने काढलेल्या भव्य तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांसह खासदार पूनम महाजन, आमदार आशीष शेलार, पराग अळवणी सहभागी झाले होते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोटरसायकल चालवून या यात्रेचे नेतृत्व केले. पालिकेच्या २०३ प्रभागांतून काढण्यात आलेल्या या यात्रेत पक्षाचे दीड-दोन हजार नेते, कार्यकर्ते दुचाकींवरून सहभागी झाल्याचा पक्षाचा दावा आहे. राष्ट्रभक्तीच्या भावनेचा मुद्दा वापरून मुंबईतील कार्यकर्त्यांना एकत्र आणून भाजप वातावरण तापवीत आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याकरिता मेळावे, यात्रा यांसारखे मार्ग अवलंबण्याऐवजी शिवसेना नेते मात्र विविध योजनांचा नारळ वाढविण्यात दंग आहेत.
ब्रिटानिका पंपिंग स्टेशनचे लोकर्पण, नायरचे कॅथलॅब आणि हृदयरोग अतिदक्षता विभागाचे लोकार्पण, वरळीतील वाहतूक बेटाचे लोकार्पण अशा योजनांचा धडाका सेनेने लावला आहे. मात्र, या माध्यमांतून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा अन्य नेते पोहोचत नसल्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे.
दहीहंडीलाही क्रीडाप्रकार म्हणून मान्यता मिळविण्यासाठी भाजपने शासकीय पातळीवर प्रयत्न केले व मान्यता मिळविली. दहीहंडीची कमाल उंची किती असावी आणि १२ की १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना सर्वात उंच थरावर जाण्यास मनाई असावी, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
त्यावर गुरुवारी निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर दहीहंडीचा उत्सव अधिकाधिक उत्साहाने साजरा करण्याबाबत भाजपकडून नियोजन केले जाणार आहे. दहीहंडी या क्रीडाप्रकाराला सरकारने मान्यता दिल्यानंतर ‘जोड के तोड’ या स्पर्धाचे आयोजन शेलार यांनी केले असून अंतिम फेरी वांद्रे येथे होणार आहे, असे शेलार यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या विषयांवर भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसते आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती शिवसेनेच्या बरोबर असून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांबरोबर नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षांतील संघर्ष आता उत्सवांच्या पातळीवर पोहोचेल, असे चित्र दिसत आहे.