भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची भेट घेऊन जागा वाटपाची चर्चा करण्याची तयारी दर्शविली. महायुतीच्या वतीने जनतेच्या प्रश्नांवर संयुक्त आंदोलने करण्याबाबत या वेळी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीमध्ये लवकरात-लवकर जागावाटपाची चर्चा करावी, अशी मागणी रामदास आठवले सातत्याने करीत आहेत. परंतु त्याला सेना-भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आठवले नाराज होते.
गेली अनेक वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आरपीआयची युती होती. परंतु त्या पक्षांनी आरपीआयला अगदी शेवटच्या क्षणी किरकोळ व पडेल जागा देऊन कायम बोळवण केली. त्याच काँग्रेसी नीतीचा सेना-भाजपने अवलंब करू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. सेना-भाजपकडून आरपीआयला सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.  
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी त्यांची भेट घेतली. आठवले यांच्या संविधान या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. आरपीआयने त्यांना अपेक्षित असलेल्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी द्यावी. त्यावर भाजपच्या कोटय़ातील जागांबाबत चर्चा करण्याची तयारी फडणवीस यांनी दर्शविली. आरपीआयच्या  सन्मानासाठी भाजपने तर पहिले पाऊल पुढे टाकले, आता शिवसेना कशा प्रकारे प्रतिसाद देते, याकडे रिपब्लिकन नेत्यांचे लक्ष लागले आहे.
मनसेची गरज किती?
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील मतांमधील फूट टाळण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आठवले व फडणवीस यांनी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र आघाडीचा पराभव करण्यासाठी महायुतीत मनसेच्या समावेशाची गरज नाही, असा सूर आठवले यांनी पुन्हा आळविला. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यावर मौन पाळणे पसंत केले.