निम्म्या जागांऐवजी १३० जागा देण्याची मागणी शिवसेनेने धुडकावल्यानंतरही भाजपने युतीसाठी आटापिटा सुरूच ठेवला आहे. जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेला शुक्रवारची मुदत देणाऱ्या भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या बैठकीनंतर मात्र अचानक नरमाईची भूमिका घेतली. ‘आम्हाला युती टिकवायचीय’ असे सांगत शुक्रवारी भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेकडे नवा प्रस्ताव पाठवला. मात्र ‘आमचे मिशन १५० कायम आहे’ असे सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला धुडकावून लावले.
जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी दिलेली मुदत शिवसेनेने फेटाळून लावल्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होती. युती कधीही तुटू शकते, असे वातावरण सकाळी निर्माण झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत बैठक पार पडली. नितीन गडकरी दिल्लीहून मुंबईला येण्यास निघाले होते, परंतु उद्धव ठाकरे यांच्याऐवजी सेनेच्या अन्य नेत्यांशी प्रदेश पातळीवरील नेत्यांनीच चर्चा करावी, असा निरोप पाठवून ते विमानतळावरूनच माघारी फिरले. त्यानंतर दुपारी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांच्यासोबत पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक झाली व तडजोडीचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावासंदर्भात सायंकाळी माथूर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे व सुभाष देसाई यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी ‘महायुती कायम राहील’ असे जाहीर केले. मात्र, जागावाटपाबाबतचे मतभेद मिटले नसल्याचेही सांगण्यात आले. ‘राज्य काँग्रेसमुक्त करण्यासाठी दोन्ही पक्षांचे एकमत असून युती कायम रहावी,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र मिशन १५० यावरही ठाम असल्याचे सांगत भाजपला अधिक जागा देणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले.  
रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांत स्वतंत्र बैठका सुरू होत्या. शिवसेनेने आपला प्रस्ताव दिला असून भाजप त्यावर निर्णय घेईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सांगितले. पण महापौर बंगल्यावर शिवसेना नेत्यांच्या झालेल्या बैठकीत भाजपला अधिक जागा देऊ नये, असे ठरविण्यात आले. भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यत खलबते सुरू होती.  
सत्ताबाजार
आधी जागांचं बोला, मग आघाडीचं!
शिवसेनेच्या नाराजीस कारण की..
भाजपने मोठेपणा दाखवला..
पुढे चालवू हा आम्ही ‘वारसा’
प्रतीक्षा घटस्थापनेची