देशभरात उसळलेल्या नरेंद्र मोदींच्या त्सुनामीच्या प्रभावात मुंबईसह महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती दाणादाण उडाली. तब्बल ४० हून अधिकजागा पटकावणाऱ्या भाजप-शिवसेनेला महाराष्ट्रात एवढे प्रचंड यश प्रथमच मिळाले. अपेक्षेहूनही भरभरून मिळालेल्या या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीतील घटकपक्षांना बरोबर घेऊन अधिक भरारी घेण्याच्या तयारीत आहे. मात्र या निकालाचा परिणाम महायुतीतील जागावाटपावरही होण्याची शक्यता असून भाजप नेते
नवी रणनीती आखण्याच्या तयारीत
आहेत.
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत मुंबईत जनता पार्टीला संपूर्ण यश मिळाले, तरी महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक उमेदवार निवडून आले होते. यावेळी मात्र मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार आणि मंत्र्यांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. मोदींच्या करिष्म्यामुळे सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला.
मुंडेंचे बेरजेचे राजकारण यशस्वी
महाराष्ट्रात निवडणुकीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होते. त्यांनी युतीच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी चांगले प्रयत्न केले आणि महायुतीची मोट बांधली. राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मराठा महासंघाचे विनायक मेटे यांना सोबत घेऊन बेरजेचे राजकारण केल्याचा फायदा महायुतीला झाला.
..तर जागा वाढल्या असत्या
माजी ‘आदर्श’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये विजय मिळविला. मुंडेंच्या आग्रहामुळे भाजपने डी. बी. पाटील यांना येथे उमेदवारी दिली. येथे तगडा उमेदवार दिला असता तर भाजपचा विजय निश्चित होता, असे पक्षातील ज्येष्ठांचे मत आहे. बारामती या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून लढताना महादेव जानकर यांना कमळ या चिन्हाचा वापर न केल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागल्याचे बोलले जात आह़े