शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत असून यासंबंधी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत असं उद्दव ठाकरेंनी म्हटलं होतं, त्यामुळे शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार,” असं म्हटलं. युती व्हावी हीच आमची इच्छा असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

भाजपाने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर २०१४ प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाली नाही तरी पुढील १५ दिवसांनंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत सरकार स्थापण्याची योजना असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

आणखी वाचा- सत्य नाकारुन भाजपाने ‘डेड लॉक’ निर्माण केला आहे शिवसेनेने नाही-राऊत

मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अल्पमतातील सरकार बसवण्याची कोणतीही योजना नसून शिवसेना-भाजपाचं स्थिर सरकार देणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबत आज सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात येण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं सांगितलं. तसंच शिवसेनेच्या आमदारांना कोणी फोडत नसल्याचंही म्हटलं आहे. १५ वर्ष सत्तेबाहेर असूनही फुटलो नाही, मग आता का फुटणार? असं सांगत त्यांनी आमदार फुटण्याची शक्यता नाकारली. “काँग्रेसच्या तरुण आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केल्याचं कुठेही दिसलं नाही. आपण जर शिवसेनेला पाठिंबा दिला तर आपण आयुष्यभरासाठी राज्याबाहेर पडू अशी भीती काँग्रेसला आहे,” असं यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीनेही चार वेळा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

शिवसेनेसोबत युती करावी, दुसरा पर्याय बघू नये असाच संदेश केंद्रातून असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबद्दल बोलताना, “संघ राजकारणात कधीही सक्रिय भाग घेत नाही. कोण मंत्री, मुख्यमंत्री याची काळजी त्यांना नाही. संघ देशहिताच्या दृष्टीने सक्रीय आहे. संघ भाजपा समर्थक किंवा काँग्रेस विरोधक नाही. देशहितासाठी काम करणारी ही संघटना आहे. संघाच्या दृष्टीने सर्व नेते समान आहेत. सरसंघचालकांचं प्रेम जितकं भाजपावर आहे, तितकंच शिवसेना आणि काँग्रेसशी आहे,” असं त्यांनी सांगितलं.