करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या राज्यभरातील आंदोलनाला भाजपने उघडपणे पाठिंबा दिला आहे. भाजपने फू स दिल्यामुळेच व्यापारी वर्गाने कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.

मुंबईत व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी यासाठी मुंबई भाजपने पुढाकार घेतला आहे. व्यापारी आणि दुकानदारांना उदरनिर्वाह करण्याचा मूलभूत अधिकार आहे. करोनासारख्या महासाथीला वेळीच आळा घालणेही आवश्यक आहे. परंतु व्यापारी आणि दुकानदारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुकाने सुरू ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे. व्यापारी आणि दुकानदारांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी दुकाने उघडी ठेवण्याची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली.

ठाण्यात भाजप आमदारही रस्त्यावर

ठाण्यात दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी मिळावी म्हणून व्यापाऱ्यांबरोबर भाजपचे नेते रस्त्यावर उतरले होते. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. कठोर निर्बंध असू दे, पण सर्व काळ टाळेबंदी नको. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी देणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.

नागुपरात आंदोलनाचे नेतृत्व

नागपूर : अंशत: टाळेबंदीला व्यापारी विरोध करीत असल्याचे वरवर दिसत असले तरी या आंदोलनाला भाजपची फूस असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपुरात बुधवारी भाजप आमदाराच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या व्यापारी आघाडीने आंदोलन केले. अमरावतीत पक्षाच्याच आजी-माजी आमदाराच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन टाळेबंदी मागे घेण्याची विनंती केली. अकोल्यातही व्यापारी संघटनेत भाजप विचारसरणीच्याच व्यापाऱ्यांचा भरणा असल्याने त्यांनीही विरोधी सूर लावला.

मागच्या वर्षी टाळेबंदीदरम्यान व्यापाऱ्यांना एक दिवसाआड दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे व्यापारीही समाधानी होते व लोकांचीही गैरसोय होत नव्हती. असाच तोडगा याही वेळी सरकारने काढायला हवा. सरसकट टाळेबंदी व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारी आहे, सरकारने ती मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिला.

पुण्यात ‘सविनय आंदोलन’

पुणे : निर्बंध लागू करण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजपच्या व्यापारी आघाडीने बुधवारी बिबवेवाडी परिसरातील दुकाने उघडून ‘सविनय आंदोलन’ सुरू केले. पिंपरी-चिंचवड शहरातील १७ व्यापारी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपच्या व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली बिबवेवाडी परिसरातील हार्डवेअरचे दुकान उघडून आंदोलन के ले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह व्यापारी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. कठोर निर्बंधांच्या नावाखाली टाळेबंदी लादण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होऊन शहराची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. निर्बंध तातडीने शिथिल करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रि या भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरमध्ये उद्रेकाचा इशारा

कोल्हापूर  : पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर या चारही जिल्ह््यांत व्यावसायिक, व्यापारी निर्बंधांना विरोध करीत आहेत. तसेच या विरोधाची धार वाढवण्यातही बहुतांश ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी निर्बंधांना विरोध करत बाजारपेठ उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यास भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले धावले. त्यांनी व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत प्रशासनाला निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही याबाबत पत्रकार परिषद घेत व्यापाऱ्यांवरील निर्बंध तातडीने मागे न घेतल्यास उद्रेक होईल, असा इशारा दिला.

सांगलीत आज मोर्चा

सांगलीतही व्यापारी निर्बंधांना विरोध करीत आहेत. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिले असून व्यापारी पेठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. गुरुवारी भाजपच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

कोल्हापुरात निर्बंधाविरोधात भाजपच्या नेतृत्वाखालीच आंदोलनाची दिशा ठरली आहे. भाजप या सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून शासनाने आपला निर्णय तातडीने न बदलल्यास भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा कोल्हापूर महानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिला.

करोना काळात गेल्या वर्षी अर्थकारण बिघडले. आता नव्याने टाळेबंदी केल्याने व्यापारी – व्यावसायिक हतबल होत आहेत. त्यांचा अंत महाविकास आघाडी सरकारने पाहू नये, असा इशारा रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिला.

असंतोषाचा उद्रेक का?

* करोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू के ले. त्यानुसार अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आहे. यावरून व्यापारी वर्गात मंगळवारी अस्वस्थता पसरली.

* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने तर गुरुवारपर्यंत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास शुक्र वारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा दिला. व्यापारी ठिकठिकाणी रस्त्यांवर आले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यापाऱ्यांना पाठिंबा दिला.

* भाजपच्या नेत्यांच्या चिथावणीमुळेच ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निदर्शनास आले. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी तातडीने व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.