विधानपरिषद सभापतींविरोधातील अविश्वास ठरावावर राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देऊन शिवसेनेला सूचक इशारा देण्याची राजकीय खेळी भाजपने केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होऊन विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर ते टिकविण्यासाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत पुन्हा घेण्यासही कचरणार नाही, असेच भाजपने यानिमित्ताने शिवसेनेला बजावले आहे. त्याचबरोबर या मदतीची परतफेड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले उपसभापतीपद भाजप मिळविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकार टिकविण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आधीपासूनच तटस्थ राहून किंवा बाहेरुन पाठिंबा देण्याची आणि सरकार पडणार नाही, याची काळजी घेण्याची भूमिका जाहीर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्यामुळे सरकार टिकविल्याची टीका भाजपवर करण्यात आली. त्यावेळी शिवसेना विरोधात असल्याने आवाजी बहुमताची खेळी करुन विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला होता. सभापतींवरील अविश्वास ठरावासाठी मात्र सभागृहात उघडपणे मतदान आवश्यक होते आणि किमान ४१ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याखेरीज तो मंजूर होणे शक्यच नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या ठरावाला पाठिंबा देण्याखेरीज भाजपपुढे अन्य पर्याय नव्हता. ठरावाला विरोध केला असता, तरी काँग्रेसला मदत करुन काहीच साध्य झाले नसते. शिवसेनेने काँग्रेसच्या भूमिकेला सभागृहात पाठिंबा दिला तरी मतदानाच्या वेळी तटस्थ राहून आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला.
देश काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय असलेल्या भाजपने राष्ट्रवादीशी जवळीक अधिक घट्ट करीत शिवसेनेला कृतीतून इशारा देण्याची खेळी खेळली. शिवसेना नेत्यांनी सरकारमध्ये सामील असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर अनेकदा टीका केली आहे. भाजपने फारसे प्रत्युत्तर दिले नसले तरी थंड डोक्याने राजकीय खेळी करुन शिवसेनेला कृतीतून प्रत्युत्तर दिले आहे.
उमाकांत देशपांडे, मुंबई
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 1:52 am