भाजप जाणीवपूर्वक बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला आहे. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राणे यांनी हे वक्तव्य केले. हे विधान करून राणेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र, खडसे भाजपमधील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांत खडसेंच्या इभ्रतीचे ज्याप्रकारे धिंडवडे काढण्यात आले, त्यावरून भाजप बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असे दिसत असल्याचे राणे यांनी म्हटले.
भाजपकडून गेल्या काही दिवसांत बहुजन समाजाच्या नेत्यांवर ठपका ठेवणे आणि त्यांच्यावर आरोप करण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. एका बाजूला देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर खडसेंना क्लीन चीट देतात आणि दुसरीकडे पक्षाकडे खडसे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आग्रह धरतात. खडसे यांच्यासारख्या नेत्याचे इतके धिंडवडे काढण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 12:39 pm