काँग्रेसला हात; अपक्ष आणि स्थानिक आघाडय़ांची सरशी; राणेंना दिलासा

सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून सत्ताधारी भाजपची मात्र पीछेहाट झाली आहे. सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या असून शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी २० जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला मात्र अवघ्या पाच जागांवरच विजय मिळवता आला. तर अपक्ष व स्थानिक आघाडय़ांचे ३६ सदस्य निवडून आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या १९ नगरपंचायतींच्या निवडणुकांतही सर्वाधिक जागा काँग्रेसला प्राप्त झाल्या होत्या तर भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या १९ नगरपंचायतींच्या निवडणुकांत एकूण ३४५ जागांपैकी काँग्रेसला १०५, राष्ट्रवादीला ८० तर भाजपला ३९ जागा मिळाल्या होत्या. पहिल्या टप्प्यात झालेल्या ६५ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती.

कुडाळात राणेंची सरशी

विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातील पराभवाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय फटका बसला होता. या पाश्र्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक राणे तसेच शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. १७ पैकी नऊ जागा जिंकून काँग्रेसला बहुमत मिळाले. कोकणात राणे राजकीयदृष्टय़ा संपले, असा प्रचार शिवसेनेने सुरू केला होता. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सोलापुरात राष्ट्रवादीचे पानिपत

सोलापूर जिल्ह्य़ातील माढा नगरपालिकेच्या निवडणुकीत १७ पैकी चारच जागा राष्ट्रवादीला मिळाल्या असून, तेथील सत्ता पक्षाला गमवावी लागली.  मोहोळमध्येही शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आला.

गेल्या दीड वर्षांत झालेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सातत्याने भाजपचा पराभव झाला आहे. यावरून राज्यातील जनतेत भाजपच्या विरोधात रोष असल्याचे सिद्ध होते.

– खासदार अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.