विधानपरिषद निवडणुकीत मुंबईत शिवसेनेच्या रामदास कदम यांनाच भाजप नगरसेवकांची सर्व मते देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे कदम यांचा विक्रमी मतांनी विजय होण्याची चिन्हे असून काँग्रेसचे भाई जगताप व अपक्ष प्रसाद लाड यांच्यात दुसऱ्या जागेसाठी लढत होणार आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याची चर्चा सुरु असल्याने भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांनी माघार घेतल्यानंतर भाजपने आपली मते शिवसेनेच्या उमेदवाराला देऊ केली आहेत. भाजपने अधिकृतपणे कदम यांना मते देण्याचे आणि दुसरया पसंतीक्रमाची मते कोणालाही न देण्याचे जाहीर केले असले तरी शिवसेनेला भाजपची अजूनही पूर्ण खात्री वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्यासाठी भाजपची खेळी असू शकते, अशीही शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत आमचा उमेदवार नाही व केवळ शिवसेनेला पाठिंबा राहील, असे भाजपमधील उच्च पदस्थांनी स्पष्ट केले