बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या पुण्याईचे फळ आजचे राज्यकर्ते चाखत आहेत, असे सांगत शिवसेनेने भाजपाला जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लिहलेल्या विशेष अग्रलेखात याविषयी भाष्य करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्याच हिंदुत्वाच्या पुण्याईचे फळ आजचे राज्यकर्ते चाखत आहेत. आज हिंदुस्थान संकटात आहे व हिंदुत्वात राजकीय स्वार्थाची भेसळ सुरू आहे. बाळासाहेब हे गरुडझेप घेणारे होते. बाकी सगळे पुंग्या वाजवणारे ‘गारुडी’ बनले आहेत, असे सांगत शिवसेनेने भाजपला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे.

याशिवाय, या अग्रलेखातून गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या जातीय संघर्षाच्या मुद्द्यावरूनही भाजपावर टीका करण्यात आली आहे. तोंडाची डबडी वाजवून आरोप-प्रत्यारोपांचा गोंधळ घालणे यालाच काही जण राजकारणाचा मुलामा देत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे राजकारण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी ना शिवसेनेत जातीपातीचा विचार केला ना समाजकारण किंवा सत्ताकारण करताना केला. मात्र आज महाराष्ट्राची स्थिती काय आहे? महाराष्ट्र आज जेवढा नाती-जाती-पोटजातींत फाटला आहे तेवढा याआधी कधीच विभागलेला नव्हता. किंबहुना, राज्याच्या सामाजिक एकोप्याच्या अशा काही चिंधडय़ा उडाल्या आहेत की, त्यास ठिगळं लावणेही जिकरीचे झाले आहे. जातीपातीचे झेंडे घेऊन कुणी रस्त्यांवर उतरले नव्हते, पण आज राज्यातील अठरापगड जाती व पोटजाती त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून दुसऱ्या जातीच्या नावाने जो शिमगा करतात व इतर जाती-पोटजातींना पाण्यात पाहून राज्याच्या भवितव्याचे डबके करतात ते पाहून बाळासाहेबांनंतर राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या कशा चिंधडय़ा उडवल्या आहेत ते स्पष्टच दिसते. भीमा-कोरेगाव प्रकरणाची आग अद्याप विझलेली नाही. ती आग विझवणारा व खवळलेल्या समुदायास एका आदेशाने ‘शांत’ करणारा नेता उरलेला नाही, असे सांगत शिवसेनेने भाजपा नेतृत्त्वाला लक्ष्य केले आहे.

शिवसेना नव्हती तोपर्यंत महाराष्ट्र म्हणजे दिल्लीच्या वाटेवरील एक पायपुसणे होते. मुंबई, महाराष्ट्राची लूट करून थैल्या दिल्लीचरणी अर्पण करण्याचे लाचार उद्योग सुरू होते. बाळासाहेबांनी एक वज्रमूठ निर्माण केली. महाराष्ट्राकडे जो वाकडय़ा नजरेने पाहील त्याचे डोळे काढून हातात देणारी एक मर्द पिढीच त्यांनी भगव्या झेंडय़ाखाली तयार केली. आज मात्र कोणीही येतो व महाराष्ट्रास टपली मारतो, असेही अग्रलेखात म्हटले आहे.