राज्यातील राजकारणात आता भाजपची लाट ओसरल्याने व बदलत्या वातावरणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असे चित्र असल्याने एकटय़ाने निवडणुका लढल्यास निभाव लागणार नाही, हे सत्ताधारी भाजपने ओळखले आहे. त्यामुळे स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती करावी, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नुकतीच नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे युती होईल की नाही नंतर ठरेल, पण ठाकरे हे युतीची चर्चा करण्यास राजी असल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदार-खासदारांची बैठक घेत स्वबळावर निवडणूक लढण्यास शिवसेना समर्थ असल्याचा संदेश दिला. राज्यातील विरोधी पक्षांचे सत्ताधारी युतीमधील घडामोडींवर साहजिकच बारीक लक्ष आहे. युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ते खूपच सोयीचे ठरणार आहे. उद्धव यांच्या विधानांच्या पाश्र्वभूमीवर भाजप युतीतून शिवसेनेला बाहेर पडू देईल, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.