विकास आराखडा निवडणुकीपर्यंत लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न

मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत मुंबईचा विकास आराखडा लांबणीवर टाकण्यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेतील सत्ताधारी म्हणून विकास आराखडा मंजूर करण्याचे सर्वाधिकार असतानाही मंगळवारी याच मुद्दय़ावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला.

मुंबईच्या सुधारित विकास आराखडय़ावरून शिवसेना आणि भाजपत पुन्हा एकदा शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या माध्यमातून आपल्याला हवा तसा विकास आराखडा तयार करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता असूनही आयुक्तांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेल्या शिवसेनेने आता याच विकास आराखडय़ाच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विकास आराखडय़ात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. विकास आराखडा अंतिम करताना नाविकास पट्टा, मिठागरे आणि आरे वसाहत या मोकळ्या जागा घरांसाठी खुल्या करू नका, आरे वसाहतीमध्ये मेट्रो कारशेड नको,  अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. मात्र विकास आराखडा मंजूर करण्याचा अधिकार महापालिकेचा असून केवळ अंतिम मंजुरीसाठी तो शासनाकडे येतो, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा डाव त्यांच्यावरच उलटविला.

ल्ल मुख्यमंत्र्यांनी थेट महापालिका आयुक्तांना दूरध्वनी करून विकास आराखडय़ाचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवाव्यात. त्यावर चर्चा करून अंतिम आराखडा महासभेत संमत झाल्यानंतर शासनाकडे पाठवावा, अशा सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.