नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सपाटून मार खाव्या लागणाऱ्या भाजपवर आता विरोधक तुटून पडले आहेत. या पराजयामुळे भाजपचा अश्वमेधाचा वारू लंगडा झाला आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ते गुरूवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर एक गंभीर आरोप केला. नांदेडमध्ये भाजपच्या विजयासाठी राधेश्याम मोपलवार यांनी ३०० कोटी रूपये पुरवले. भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रतापराव चिखलीकर यांच्या माध्यमातून हे पैसे वापरण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.

भाजपच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात- अशोक चव्हाण

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना समृद्धी महामार्ग प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपांमुळे पदावरून पायउतार व्हावे लागले होते. सध्या त्यांची या प्रकरणी चौकशी सुरू आहे. मात्र, त्यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीवर प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिणीचे जावई असलेले आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळेच भाजपशी जवळीक असलेल्या मोपलवार यांना क्लीन चीट मिळेल, अशी चर्चा आहे. या मोबदल्यात मोपलावर यांनी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला ३०० कोटी रूपये पुरवले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे सर्वप्रथम प्रवीण पडवळ यांना समितीवरून हटवण्यात यावे. त्याऐवजी न्यायालयीन समितीकडून मोपलवारांची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी या निकालानंतर नांदेडच्या जनतेचे खुल्या मनानं अभिनंदन करावं, अशी उपरोधिक टीकाही मलिक यांनी केली. पार्टी विथ डिफरन्स सांगणारा पक्ष सगळ्या पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र नांदेडच्या जनतेनं भाजपाला नकार दिला. यावरूनच देशातील वातावरण बदलत असल्याचं दिसत आहे, असेही मलिक म्हणाले.

आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार पदच्युत, मुख्यमंत्र्यांची घोषणा