News Flash

विधान परिषद निवडणुकीत आकडय़ांच्या खेळात शिवसेनेची कसोटी

भाजप दोन, काँग्रेस एका जागेवर सुरक्षित

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| मधु कांबळे

भाजप दोन, काँग्रेस एका जागेवर सुरक्षित

विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात २१ मे ला मतदान होत आहे. सहा मतदारसंघातील मतदारांचे आकडय़ांचे गणित पाहता, तीन जागांवर लढणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. भाजप दोन, तर काँग्रेस एका जागेवर सुरक्षित राहील, अशी सध्या तरी स्थिती आहे. लातूर-बीड-उस्मानाबात मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर, कोकणात मुलाच्या विजयासाठी राजकीय समिकरणे बदलण्यात वाकबार असलेल्या माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.

राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय स्थिती बदललेली आहे. भाजपने कधी नव्हे इतकी स्थानिक राजकारणात मुसंडी मारली आहे. त्या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सोमवारी २१ मे रोजी निवडणूक होत आहे.

या निवडणुकीत स्थानिक संस्था मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक हे मतदार आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे किती सदस्य आहेत, हे स्पष्ट असल्याने, त्यावरच जय-पराजयाचे आडाखे  बांधले जातात. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड (कोकण), नाशिक आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी लढत आहे. तर अमरावती, परभणी-हिंगोली आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघमधून काँग्रेस निवडणूक लढवित आहे. शिवसेना कोकण, नाशिक आणि परभणी-हिंगोलीमधून लढत आहे. तर भाजप अमरावती, वर्धा-चंद्रपूर, लातूरमधून लढत आहे.

या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती झाली नसली तरी कुठेही त्यांचा उमेदवार एकमेकांच्या विरोधात नाही. ज्या मतदारसंघात शिवसेना लढत आहे, तिथे भाजपने उमेदवार दिलेला नाही. तरीही शिनसेनेने कुणाबरोबर युती केली नाही, असे त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यामुळे काही मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलू शकतात, असे बोलले जाते.

कोकणात या वेळी सुनील तटकरे यांनी आपला मुलगा अनिकेतला रिंगणात उतरविले आहे. मागच्या वेळी त्यांचे बंधू अनिल तटकरे यांना त्यांनी निवडून आणले होते. कोकणातील राजकीय पक्षांचे बलाबल लक्षात घेता, सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना आहे. परंतु काँग्रेसचा पाठिंबा राष्ट्रवादीला आहेच, त्याचबरोबर तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष, शेकाप यांना बरोबर घेतल्यामुळे तेथील राजकीय समिकरणे बदलेली आहेत. या मतदारसंघात भाजपची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. एकाकी लढणाऱ्या शिवसेनेची याच मतदारसंघात खरी कसोटी लागणार आहे.

या निवडणुकीत लातूर-बीड-उस्मानाबातमधील निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजमधून राष्ट्रवादीमध्ये आणलेल्या रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने मुंडे यांना जोरदार झटका बसला. भाजपने राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या मतदारसंघातील पक्षीय बलाबल लक्षात घेता, काँग्रेस-राष्ट्रवादीत एकोपा राहिला तर, भाजपसाठी ही जागा अवघड आहे. शिवसेना कुणाच्या बाजुने राहिली तरी, राष्ट्रवादी-भाजपमध्येच खरा सामना होणार आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. परंतु एकटय़ाच्या ताकदीवर निवडून येणे अवघड आहे. राष्ट्रवादी ही जागा लढवित आहे. थोडय़ा फार फरकाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्या बळ सारखे आहे. भाजपचे निर्णायक संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपची भूमिका महत्तवाची ठरणार आहे. भाजप-शिवसेनेची युती नसल्यामपळे या मतदारसंघातील निकाल आश्चर्यकारक लागले, अशी चर्चा आहे. शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर या दोन मतदारसंघातील संख्याबळाचा विचार करता या ठिकाणी भाजप सुरक्षित आहे. परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने काँग्रेसची बाजू भक्कम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:18 am

Web Title: bjp vs congress party in mumbai
Next Stories
1 माथेरानच्या आकाशगंगा प्रकल्पाला ग्रहण
2 औरंगाबादमधील शिवसेनेचा मोर्चा पोलिसांनी रोखला!
3 संविधानाला धक्का लावल्यास भाजपाची साथ सोडू
Just Now!
X