विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका दिवसात शिवसेना व भाजपधील दोन स्थानिक नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही देऊन टाकली. भाजपने राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्र्याला उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर-बीड-उस्मानाबाद, परभणी-हिंगोली, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, नाशिक आणि अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समिकरणे बदललेली आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर पूर्वी चौथ्या-पाचव्या स्थानावर असलेल्या भाजपने स्थानिक संस्थांच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे ही निवडणूक वेगळी आणि रंगतदार ठरणार आहे.

या निवडणुकीत उमेदवारी देताना निष्ठावंत वगैरे हे पारंपारिक निकष बदलून निवडून येण्याची क्षमता असलेल्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविली. त्यानुसार भाजप व शिवेसनेतील दोन कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारीही देऊन टाकली.

विधान परिषदेतीली विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बुधवारी उस्मानाबादमध्ये भाजपचे स्थानिक नेते रमेश कराड यांनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि दुपारी त्यांनी लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. नाशिक स्थानिक संस्था मतदारसंघातील छगन भुजबळ यांचे समर्थक व विद्यमान आमदार जयंत जाधव यांना डावलून शिवसेनेचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी पक्षात प्रवेश केला आणि लगेच त्यांनी उमेवारी अर्जही दाखल केला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून सहाणे यांनी निवडणूक लढविली होती. आता राष्ट्रवादीने त्यांनाच उमेदवारी दिली आहे.

सुरेश धस भाजपच्या वाटेवर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सुरेश धस हे भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. बीड जिल्हा परिषद निवडणुकीपासून धस पक्षातून दूर झाले आहेत. आता त्यांना लातूर-बीड-उस्मानाबादमधून उमेदवारी देण्याचे भाजपने ठरविले आहे. उद्या ते उमेदवारी अर्ज भरतील, असे सांगण्यात येते.