‘तुमचे आठवले, तर आमचे आंबेडकर!’

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी आंबेडकरी नेत्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आंबेडकर भवन पाडल्याच्या विरोधात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विराट मोर्चात शिवसेनेचे नेते सहभागी झाले होते. आता याच प्रश्नावर आज, गुरुवारी भारिप, रिपब्लिकन सेना व शिवसेनेचे नेते एकत्रितपणे राज्यपालांना भेटणार आहेत. शिवसेनेने भीमशक्ती-शिवशक्ती संगमाचा प्रयोग करून युतीमध्ये आणलेले रामदास आठवले भाजपसोबत गेल्याने, प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने उभे राहून वेगळी राजकीय समीकरणे मांडण्यास शिवसेनेने सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत घेऊन शिवसेनेशी युती केली होती. त्या वेळी शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देण्यात आला होता आणि राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल अशी भाकिते वर्तविली गेली होती. परंतु लगेचच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा फारसा परिणाम दिसलाच नाही. पुढे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी संबंध तोडून आठवले व त्यांच्या पक्षाने भाजपबरोबर युती केली. आठवले यांनी शिवशक्तीला सोडून संघशक्तीच्या जवळ गेले.

दादर येथील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ गेल्या १९ जुलैला मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रामदास आठवले यांचा गट वगळून इतर लहान-मोठय़ा रिपब्लिकन गटांचे, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. आंबेडकर यांनी त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्या मोर्चात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी डाव्या पक्षांबरोबरोबरच शिवसेना व काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते. विशेष करून शिवसेना नेत्यांच्या सहभागाची राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली.

आंबेडकर भवन पाडणाऱ्या तथाकथित विश्वस्तांवर कारवाई करावी, यासाठी गुरुवारी भारिप बहुजन-महासंघाचे आमदार बळीराम शिरसकर, ज.वि.पवार, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे अर्जून डांगळे, महेश भारती, सुनील कदम, उत्तम खोब्रागडे या आंबेडकरी नेत्यांबरोबरच शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे एकत्रित शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. आंबेडकर भवन पाडल्याच्या विरोधात शिवसेनेने उघडपणे भूमिका घेतली. भाजपकडे आठवले असले तरी, प्रकाश आंबेडकर व अन्य रिपब्लिकन नेत्यांशी जवळीक साधून महापालिका निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी नव्याने शिवशक्ती-भीमशक्तीची जुळवाजुळव करण्याची शिवसेनेची ही राजकीय खेळी असल्याचे मानले जात आहे. अर्थात त्याला प्रकाश आंबेडकर व अन्य नेते  प्रतिसाद देतील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.