अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर राज्य सरकारने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असून, लाखो लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात. लोकल सेवा सुरु करतानाच राज्य सरकारने वेळेचे बंधन घातले आहे, त्यावरुन विरोधी पक्षात असलेला भाजपा आक्रमक झाला आहे.

राज्य सरकारचा लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय केवळ धूळफेक आहे. सकाळी सात ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असताना, केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

“सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास करोना वाढेल, असे कारण देणाऱ्या ठाकरे सरकारने दुसरीकडे मात्र दारूची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बसेस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे.” असे भातखळकर म्हणाले.

“मुंबईच्या नागरिकांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या  मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे.” अशी टीका सुद्धा भातखळकर यांनी केली आहे.

“राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ लोकल सुरु करावी, अन्यथा भारतीय पक्षा तर्फे मोठे जनआंदोलन केले जाईल” असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.