आरोप बिनबुडाचे असल्याचा रावसाहेब दानवे यांचा दावा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत कोणताही हस्तक्षेप करणार नाही व ती सुरूच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने एकाकी पडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाठराखण केली आहे. खडसेंविरोधातील आरोप बिनबुडाचे असून, भाजप त्यांच्या पाठीशी असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.

निळजे (जि. ठाणे) येथे सामाजिक संस्थेसाठी जमीन देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून खडसे यांचा ‘कथित सहकारी’ असलेल्या गजानन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी खडसेंवर हल्लाबोल केला असून, मुख्यमंत्री फडणवीस किंवा अन्य कोणीही मंत्र्यांनी खडसेंचे समर्थन केलेले नाही. पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि अन्य मंत्र्यांनी या मंत्र्यांना पाठिंबा दिला होता आणि ‘क्लीनचीट’ दिली होती. मात्र खडसे यांच्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग योग्य प्रकारे कारवाई करीत आहे व त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने खडसे एकाकी पडले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दलच्या खडसे यांच्या नाराजीत भर पडली आहे.

राज्य सरकार दुष्काळ निवारणाबाबत कोणत्या उपाययोजना करीत आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन खाते असलेल्या खडसे यांना सोबत न नेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच बरोबर नेले. अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र मंत्र्यांना बरोबर नेले होते. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या खडसे यांच्यावर एकापाठोपाठ एक आरोप होत असताना पक्षातील कोणीही त्यांच्यासाबेत नाही, असे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर खडसे यांनी भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन दानवे यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाल्यावर भाजप खडसे यांच्या पाठीशी असल्याचे दानवे म्हणाले.

तावडे, मुंडे, बापट यांना अभय

विविध आरोप झाल्यावर विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि गिरीश बापट या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अभय दिले होते. पण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयावर तीन महिने लक्ष होते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे खडसेही संतप्त झाले आहेत.

बोगस पदवी किंवा अन्य आरोपांनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बाजू मुख्यमंत्र्यांनी उचलून धरली होती. चिक्की घोटाळाप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले. डाळीच्या खरेदीवरून आरोप झाल्यावर बापट यांना मुख्यमंत्र्यांनी अभय दिले. डॉ. रणजित पाटील यांच्यावरील आरोपांनंतरही मुख्यमंत्र्यांनी सांभाळून घेतले. ३० कोटींची लाचप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयाला अटक झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे भाजप नेते आश्चर्यचकीत झाले. पाटील हा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर होता, असे सांगत खडसे यांच्यावर सारे शेकविले आहे.