शिवसेनेशी लगेच सूर जुळणे कठीण -चंद्रकांत पाटील

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : महाआघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत असून शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठीच तयारी सुरू करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. महाआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राज्य अधिवेशन १५ आणि १६ फेब्रुवारीला नवी मुंबईत होत असून, पाटील त्यात पदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातील पुढील वाटचालीविषयी पाटील यांनी माहिती दिली.

तीन पक्षांचे महाआघाडी सरकार भिन्न विचारांचे असून अनेक विषयांवर मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) करायचा की राज्य पोलिसांकडून करायचा, या मुद्दय़ावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फिरविला. अशा प्रकारे महाआघाडी सरकारमध्ये मतभेद वाढत जातील व विसंवादातून सरकार पडेल, आम्हाला त्यासाठी काहीही करण्याची गरज नाही.

महाआघाडी सरकार पडल्यास भाजप पुढाकार घेऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करणार की मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाणार, असे विचारता पाटील म्हणाले, ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील आणि तेव्हाच निर्णय होईल. पण महाआघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडभावनेतून वागत आहे. आमच्या सरकारने घेतलेले अनेक जनहिताचे निर्णय फिरविले. चौकशा मागे लावल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात गैरव्यवहार केल्याचे आरोप केले गेले. त्यामुळे महाआघाडी सरकारमधील पक्षांशी भाजपची कटुता वाढत आहे. आता आम्हाला अंदमानलाच शिक्षा देऊन पाठवायचे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा कोणत्या पक्षांबरोबर सरकार स्थापन करायचे, असा सवाल त्यांनी केला.

राजकारणात कटुता, राग फार काळ टिकत नाही, असे सांगतानाच पाटील यांनी पुन्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तास्थापनेपेक्षा मध्यावधी निवडणुकांचाच पर्याय योग्य राहील, असेच संकेत दिले. मात्र त्यावेळच्या परिस्थितीवरच निर्णय अवलंबून राहील, असे स्पष्ट केले.

संघटनात्मक बांधणीवर भर

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर मी भर देणार आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात चांगली कामगिरी झाली नाही, त्यावर अधिक लक्ष दिले जाईल. तेथे कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत, त्याविषयी अभ्यास करून त्या दूर केल्या जातील. मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्षाची तयारी जोमाने करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.