राज्यातील आठ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या निवडणुका आज झाल्या. आठपैकी सहा महापालिकांमध्ये भाजपानं बाजी मारली असून, सगळ्यांचे लक्ष असलेल्या नाशिक महापालिकेत सत्ता राखण्यातही भाजपाला यश आलं आहे. नाशिकमध्ये सतीश कुलकर्णी यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे.

मुंबईत पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेने बाजी मारली. भाजपानं या निवडणुकीतून आधीच माघार घेतली होती. तर शिवसेनेनं किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिली होती. उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी एकच अर्ज आल्यानं बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत विजय मिळवत शिवसेनेने २५ वर्षांपासून असलेला दबदबा कायम ठेवला.

पुण्यात भाजपाचा महापौर
पुणे महापालिकेच्या सभागृहात निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर, मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका मांडली. एमआयएमच्या नगरसेविकेसह ५ नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित होते. महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ९७ मते, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश कदम यांना ५९ मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांना ९७ आणि आघाडीच्या उमेदवार चांदबी नदाफ ५९ एवढी मते पडली. त्यानंतर महापौरपदी भाजपाचे मुरलीधर मोहोळ, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

नाशिकमध्ये भाजपाच्या प्रयत्नांना यश
नाशिक महापालिकेत सत्ता टिकवण्यात भाजपाच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, भाजपाचे सतीश कुलकर्णी यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपा पुन्हा सत्तेत येईल की नाही, याकडे सगळ्यांचेच लक्ष होते.

पिंपरी-चिंचवड भाजपाकडेच
पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज विशेष महासभेत पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ४१ मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचेच नगरसेवक तुषार हिंगे हे बिनविरोध उपमहापौरपदी निवडून आले आहेत. याच दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी राज्यात हालचाल सुरू असलेल्या महाविकासआघाडी महापौर निवडणुकीतही एकत्र दिसली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.

चंद्रपूर आणि अमरावतीमध्येही भाजपाचे महापौर
चंद्रपूर महापालिकेत भाजपाच्या राखी कंचर्लावार यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. कचर्लावार यांना ४२ मते, तर काँग्रेसचे उमेदवार कल्पना लहामगे यांना २२ मते मिळाली. तर अमरावतीमध्येही भाजपाचं पारड जड ठरलं. भाजपाचे चेतन गावंडे यांनी ४९ मते घेत विजय मिळवला. तर एमआयएमचे उमेदवार अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना २१ मते मिळाली.

भाजपाच्या मसने अकोल्याच्या महापौर
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपाच्या अर्चना मसने यांनी विजय संपादन केला. मसने यांनी काँग्रेसच्या अजरा नसरीन यांचा ४८ विरूद्ध १३ मतांनी पराभव केला. त्याचप्रमाणे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे राजेंद्र गिरी यांची निवड करण्यात आली. गिरी यांनीही काँग्रेसच्या पराग कांबळे यांचा ४८ विरूद्ध १३ मतांनी पराभव केला.

परभणी-लातूर मनपा काँग्रेसकडे
परभणी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाविरूद्ध काँग्रेस अशी लढत झाली. राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपाच्या मंगल मुदगलकर विरूद्ध काँग्रेसच्या अनिता सोनकांबळे अशी निवडणूक झाली. महापौरपदी अनिता सोनकांबळे यांची, तर उपमहापौरपदी भगवान वाघमारे यांची निवड करण्यात आली. दुसरीकडे लातूरमध्ये बहुमत असतानाही भाजपा धक्का बसला तर काँग्रेसनं पुन्हा अडीच वर्षांनंतर महापालिकेत सत्ता संपादन केली. काँग्रेसचे उमेदवार गोजमगुंडे हे यांची लातूरचे नवे महापौर म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी भाजपाच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव केला.

उल्हासनगरमध्ये भाजपाला धक्का
उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने अवघ्या अडीच वर्षात भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई आशान विराजनमान झाल्या आहेत. लिलाबाई आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय झाला आहे. राज्यात आकाराला येत असलेल्या नव्या आघाडीचा परिणाम पालिकेतही पाहायला मिळाला. खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदासाठी भाजपाकडून सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर साई पक्षाकडून उपमहापौरपदावर असलेले जीवन इदनानी यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.