संतप्त प्रतिक्रिया; दरेकरांच्या उमेदवारीबाबत फेरविचार?

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आर. एन. सिंग या बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. दरेकर यांच्याबाबत टीकेचा भडिमार सुरू झाल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षात फेरविचार सुरू झाला आहे.

मुंबै बँक घोटाळ्यातील वादग्रस्त प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीतून दाखल झालेले प्रसाद लाड आणि काँग्रेस, शिवसेना असे सर्व पक्ष फिरून आलेले उत्तर भारतीयांचे ‘वजनदार’ नेते आर. एन. सिंग यांना उमेदवारी देऊन वर्षांनुवर्षे खस्ता खाणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपने डावलले आहे. विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत या मित्र पक्षांच्या दोन नेत्यांना उमेदवारी दिल्याने आधीच पक्षाच्या वाटय़ाच्या दोन जागा कमी झाल्या होत्या. त्यात तीन उपऱ्यांना संधी देऊन भाजपने पक्षाच्या निष्ठावानांना पक्षात काही किंमत नाही, असाच अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.

मुंबै बँक घोटाळ्याच्या चौकशीत ठपका ठेवण्यात आलेले प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडिमार होऊ लागला आहे. पक्षाने सहा अधिकृत आणि एका अपक्षाला रिंगणात उतरविले आहे. पक्षाच्या एका उमेदवाराचा अर्ज हा डमी असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. दरेकर यांना माघार घेण्यास भाग पाडावी, असा पक्षात दबाव वाढला आहे. यामुळेच दरेकर यांना एखाद वेळेस माघार घेण्यास भाग पाडले जाईल, अशी भाजपमध्ये चर्चा आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते डोळ्यासमोर ठेवून आर. एन. सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने त्यांच्या आमदारकीचे स्वप्न पूर्ण केले नव्हते. मुंबईचे नगरपाल करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते, पण त्याचीही पूर्तता करण्यात आली नव्हती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सिंग यांच्या मुलाने शिवसेनेकडून तर पुतण्याने भाजपकडून निवडणूक लढविली होती. दोघेही पराभूत झाले होते. ‘वजनदार’ सिंग यांचा निवडणुकीत पक्षाला अजिबात फायदा होणार नाही, असे पक्षात वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

लाड यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह

गेल्या डिसेंबर महिन्यात झालेली मुंबई प्राधिकारी संस्थेची निवडणूक प्रसाद लाड यांनी अपक्ष म्हणून लढविली होती व त्यांना भाजपने मदत केली होती. लाड हे राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांच्या निकटचे मानले जातात. अजिबात जनाधार नसलेल्या लाड यांना आमदारकी देऊन काय साध्य होणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्या निवडणुकीत भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आले होते. यंदा त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यांच्या अर्जावर सात अपक्ष, एक मनसे तर हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या दोन आमदारांच्या सूचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत.