रामलाल यांचा हस्तक्षेप; काही नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्यातील नियुक्त्या पक्षाच्या घटनेनुसार नसल्याच्या मुद्दय़ावरून वाद वाढला असल्याने भाजपचे केंद्रीय सरचिटणीस (संघटन) रामलाल यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करून काही नियुक्त्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजयुमो अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांच्या राज्यातच घटनेतील तरतुदी धाब्यावर बसविल्याने त्यांनी काही नियुक्त्यांना आक्षेप घेतला. मात्र त्यांना दाद देण्यात न आल्याने हे प्रकरण रामलाल यांच्यापर्यंत गेले. तरीही अजून नियुक्त्या रद्द झाल्या नसून हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला आहे.

भाजयुमोच्या घटनेनुसार उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव या पदांसाठी ठरावीक संख्या ठरवून देण्यात आली आहे. मात्र प्रदेश व मुंबई पातळीवर दुपटीने पदाधिकारी नेमण्यात आले असून त्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्या मुलांचा भरणा अधिक आहे. प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी वर्षभरापूर्वीच या नियुक्त्या केल्या. त्या वेळी भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर होते व त्यांनी कोणतेही आक्षेप घेतले नव्हते. प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या टिळेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सल्ल्याने, तर मुंबई पातळीवरील नियुक्त्या मुंबई भाजयुमो अध्यक्ष मोहित कुंभोज यांनी भाजप अध्यक्ष अ‍ॅड आशीष शेलार यांच्या संमतीने केल्या.

भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पूनम महाजन यांची नियुक्ती सहा-सात महिन्यांपूर्वी झाली. मुंबईच्या नियुक्त्या दोन-तीन महिन्यांपूर्वी झाल्या. या नियुक्त्या पक्षाच्या घटनेनुसार नसल्याचा आक्षेप पूनम महाजन यांनी घेतला आणि काही नियुक्त्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या, मात्र त्या धुडकावण्यात आल्याने राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे त्यांनीही आता यामध्ये हस्तक्षेप केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासंदर्भात पूनम महाजन, आशीष शेलार यांनी ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला. ‘यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी चर्चा करून पूनम महाजन यांच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जाईल, असे भाजयुमो प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मात्र  पदाधिकाऱ्यांना आता पदावरून हटविल्यास ते नाराज होतील आणि याआधी घटनेनुसार संख्या ठेवण्याचा आग्रह धरला गेला नसताना तो आताच कशासाठी, असा सवाल  कार्यकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबईत एका मंत्र्यांचा मुलगा, राष्ट्रीय पदाधिकाऱ्याची मुलगी आदींचाही समावेश आहे. पक्षाच्या नेत्यांच्या मुलांना पक्षात काम करण्यास मज्जाव नाही. पूनम महाजन याही ज्येष्ठ भाजप नेत्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्या नावाचा लाभ त्यांनाही होत आहे, मग अन्य नेते व पदाधिकाऱ्यांच्या मुलांना पदाधिकारी नेमल्यास आक्षेप घेण्याचे कारण काय, अशी चर्चा या नेते व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.