असंघटित कामगार, रिक्शा-टँक्सीचालक, बारा बलुतेदार आदींच्या मदतीसाठी सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीसह अन्य मुद्दय़ांवर भाजपने राज्यभरात शुक्रवारी ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलन केले. राज्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली असून केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला निधीही खर्च करण्यात येत नसल्याचा आरोप  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

करोनाचा मुकाबला करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले असून शुक्रवारी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या घराजवळ सराकरविरोधी फलक फडकावत, काळे कपडे, मुखपट्टय़ा, काळ्या फिती लावून निदर्शने केली. फडणवीस यांनी प्रदेश भाजप कार्यालय, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात, एकनाख खडसे यांनी जळगावमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत आंदोलनात भाग घेतला.

या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याचीच भूमिका भाजपने घेतली आहे आणि ती यापुढेही राहील. पण जनतेने किती यातना सहन करायच्या. त्यांच्या समस्यांना कोणी वाचा फोडायची? राज्यात शेतीमाल खरेदी पूर्णत: थांबली आहे. खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. केंद्र सरकारने पैसे दिले तरी खरेदी नीट होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे.

मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ, गुजरात राज्यांनीसुद्धा पॅकेज जाहीर केली आहेत. पण महाराष्ट्रासारखे राज्य एकाही घटकासाठी पॅकेज जाहीर करू शकत नाही, ही बाब वेदनादायी आहे असे फडणवीस यांनी सांगितले.

आंदोलन नैराश्यातून ; सत्ताधारी आघाडीची टीका

मुंबई :  भाजपने राज्यभर के लेल्या आंदोलनाचा महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी समाचार घेतला असून सत्ता गमावल्याच्या नैराश्यातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आक्रस्तळेपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त के ली. तर मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचे मुख्यालय गुजरातला हलवण्याचा निर्णय झाला त्यावेळी भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन का केले नाही, असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपच्या नेत्यांवर टीका केली. कोल्हापुरातून कोथरूडला आलेल्या  चंद्रकांत पाटील यांचे अंगण नेमके कुठले, असा टोलाही थोरात यांनी लगावला.