संदीप आचार्य 
मुंबई : करोनाबाधित रुग्णांकडून खासगी पंचतारांकित रुग्णालयाकडून वारेमाप लूटमार होत असताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे कमी म्हणून सरकारने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याने भाजपाने आज पालिका आयुक्त चहेल यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.

मुंबईत रुग्णालयात खाट मिळावी यासाठी करोना रुग्णच नव्हे तर सामान्य रुग्णही विविध रुग्णालयात फिरत आहेत. यात अनेकांचा मृत्यू रुग्णालयाची पायरी चढण्यापूर्वी वा चढता चढता झाला आहे. लीलावती, नानावटी, बॉम्बे हॉस्पिटलपासून सोमय्या रुग्णालयापर्यंत बहुतेक मोठ्या रुग्णालयात वारेमाप बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी अनेक माध्यातूनही आल्या. याची दखल घेऊन आरोग्य विभागाने ३० एप्रिल रोजी एपिडेमिक अॅक्ट १८९७ लागू केला. यात रुग्णालयांना किती व कसे बिल आकारायचे ते स्पष्टपणे नमूद केले असता महापालिका आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी तर केली नाहीच उलट सरकारने २१ मे रोजी आदेश काढून खाजगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या आदेशाचीही अंमलबजावणी केली नाही असा आरोप भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान या आंदोलनानंतर भाजपा नेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि तुम्ही मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा कधी ताब्यात घेणार असा प्रश्न विचारला. त्यावेळी आयुक्तांनी लवकरच खाटा ताब्यात घेऊ, योग्य ती कारवाई करु असं म्हणत ठोस उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तसंच लूटमार करणाऱ्या रुग्णांवर कारवाई का केली जात नाही असं प्रभाकर शिंदे यांनी विचारलं असता, आपण ही लूटमार रोखण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची नेमणूक करु आणि हे रोखण्याचा प्रयत्न करु असंही चहेल यांनी सांगितलं.

“एपिडेमिक अॅक्ट १८९७ सरकारने २१ मे रोजी लागू केला त्याला आता १४ दिवस उलटले असून आयुक्त चहेल यांनी लीलावती, हिंदुजा, वोकहार्ट, नानावटी, जसलोक, बॉम्बे हॉस्पिटलमधील ८० टक्के खाटा आजपर्यंत ताब्यात का घेतल्या नाही, असा सवाल प्रभाकर शिंदे यांनी केला. मुंबईतील करोनाचे रुग्ण रुग्णालयात खाट मिळावी म्हणून तडफडत असताना आयुक्त चहेल कोणाची ‘सुपारी’ वाजवत आहेत” असा सवाल करून या आयुक्ताविरोधात कारवाई झाली पाहिजेत अशी मागणीही गटनेते शिंदे यांनी केली.

मुंबई कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात रुग्णांना बेडसाठी वणवण भटकावे लागत आहे. बेड, आयसीयू व व्हेंटिलेटर मिळाले नाही म्हणून आतापर्यंत शेकडो गंभीर रुग्णांचे मृत्यु झाले.मात्र लुटमार करणार्या एकाही खाजगी रुग्णालयावर आयुक्तांनी स्वत: हून कारवाई केली नाही की खाजगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेतले असे, भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले. याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपा नगरसेवकांनी महापौर, पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी व मास्क बांधून सुमारे एक तास मूक धरणे आंदोलन केलं.

राज्य सरकारने २१ मे रोजी परिपत्रक काढून खासगी हॉस्पिटल मधील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र १४ दिवस झाल्यानंतरही आजपर्यंत खासगी हॉस्पिटलमधील रूग्ण बेड, अतिदक्षता – व्हेंटिलेटर बेड मुंबईकरांना उपलब्ध झालेले नाहीत.
मुंबई महापालिकेतील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, नगरसेवक अतुल शाह, कमलेश यादव, अभिजित सामंत, सुनिल यादव, ऍड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत, अनीस मकवानी, नगरसेविका उज्ज्वला मोडक, रिटा मकवाना, दक्षा पटेल, ज्योती अळवणी, राजश्री शिरवाडकर, नेहल शाह, नगरसेवक कमलेश यादव,अभिजित सामंत, सुनिल यादव,अॅड मकरंद नार्वेकर, सुषम सावंत,अनीस मकवानी सहभागी झाले होते.या नगरसेवकांनी मुंबईच्या महापौर,आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनाबाहेर तोंडावर काळी पट्टी व मास्क बांधुन मूक धरणे आंदोलन केले.

“मुंबईतील खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड म्हणजेच १६ हजार बेडस बाबत महापालिकेने श्र्वेतपत्रिका काढावी. हे बेड २४ तासात ताब्यात घ्यावेत, व त्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या डॅशबोर्डवर आणावी. हा डॅशबोर्ड मोबाइल ॲपवर सामान्य मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा. खासगी हॉस्पिटलमधील कोविड रूग्णांच्या उपचाराचे दरपत्रक प्रसिद्ध करावे. या मागण्यांसह कोरोनाग्रस्त रूग्णांप्रती महापालिकेची संवेदनहीनता उजेडात आणण्यासाठी व सत्ताधीशांना जागे करण्यासाठीच भाजप नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले” असे भाजपा प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले. महापालिकेत १२ आयएएस अधिकारी असून करोनाच्या कामासाठी सात आयएएस अधिकारी असतानाही त्यांना खाजगी रुग्णालयाकडून रुग्णांची सुरु असलेली लुटमार रोखता आलेले नाही की खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेता आल्या. यामागे एकतर पालिका आयुक्तांचे या रुग्णालयांशी साटेलोटे असले पाहिजे किंवा ते अकार्यक्षम तरी असले पाहिजे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.