भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज मुंबई पार पडली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. या नव्या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याद्वारे बिहारनंतर फडणवीस यांनी आता ‘मिशन मुंबई’ सुरु केले आहे.

मुंबई भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना फडणवीस म्हणाले, “मला विश्वास आहे की या कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल.”

“राजाचा जीव पोपटात तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत”

“ज्या प्रकारे राजाचा जीव पोपटामध्ये तसा काही लोकांचा जीव मुबंई महापालिकेमध्ये आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. आपल्याला आता मुंबई महापालिकेचीच तयारी करायची आहे. भ्रष्टाचाराचं आगार असलेली ही महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, अशा सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकारिणीला केल्या. आम्ही दोस्ती पाळायच्या काळात महापालिका देऊन टाकली, पण आता नाही. भाजपा मुंबईमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अशा सूचनाही यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

राज्यात करोनाचे सर्वाधिक केसेस असतानाही मंत्री पाठ थोपटून घेतात

फडणवीस म्हणाले, “मला कधीकधी आश्चर्य वाटतं सरकारचे मंत्री नेते सर्वाधिक केसेस असतानाही स्वतःची पाठ कसे काय थोपटून घेतात. महाराष्ट्रात जी भीषण अवस्था आम्ही बघितली ती देशात कुठेही बघितली नाही. करोनाच्या काळात काही लोकांनी आपलं चांगलं करुन घेतलं. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं. आधी आम्ही सरकारला या संकट काळात साथ देत होतो. आता मात्र यांची लक्तरं वेशीवर टांगायला सुरुवात करणार आहोत.”

करोनाच्या काळातील भ्रष्टाचारावर आम्ही पुस्तिका तयार करीत आहोत लवकरच ही पुस्तिका प्रकाशित करु आणि यांचा खरा चेहरा समोर आणू. यांना करोनाची चिंता नव्हती तर करोनाच्या नावाखाली पैसा कसा खाता येईल याची चिंता होती. लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीजबिलं आली त्यावेळी सरकारनं केंद्राची मदत घेऊन सांगितलं की, बिलामध्ये सवलत देऊ पण ऊर्जा मंत्र्यांनी काल सांगितलं की कोणालाही सवलत मिळणार नाही, अशा प्रकारे सरकारने गरिबांशी विश्वासघात केला, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.