‘भाजपच्या हिंदुत्ववादास आणि देशीवादास कोणतेही ठोस वैचारिक अधिष्ठान नाही. राजकीय लाभासाठीच त्यांनी हे मुद्दे उचलून धरले आहेत. मी मांडतो त्या देशीवादास व्यापक वैचारिक पाया आहे. त्यामुळे भाजपचा देशीवाद आणि मी मांडत असलेला देशीवाद यांच्यात कुणीही गल्लत करू नये,’ असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
भालचंद्र नेमाडे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या घरगुती कार्यक्रमात अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे मत मांडले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे तथाकथित प्रयत्न सुरू आहेत, त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘मराठी भाषा इतकी प्राचीन आहे का, हाच मूळात प्रश्न आहे. त्यातही कुठली मराठी भाषा प्राचीन आहे, हेही संशोधन करावे लागेल. पुणेरी मराठी ही काही प्राचीन मराठी नव्हे. मराठवाडा, खान्देश वैगेरे प्रदेशातील भाषा प्राचीन म्हणता येईल. पण मग तिला ‘मराठी’चा दर्जा देणार काय? आणि यासंबंधी अद्यापि कोणताही संशोधनात्मक अहवाल तयारच केला गेलेला नाही, तर मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे दूरच.’
आज आपल्याकडे इंग्रजी माध्यमात मुलांना घालण्याचे जे फॅड जोरात आहे, त्याने पुढील पिढय़ा बरबाद होणार आहेत. व्यावहारिक इंग्रजी येणे म्हणजे सर्वकाही नव्हे. ही मुले आपल्या मातृभाषेलाही मुकतात आणि धड इंग्रजीही आत्मसात करत नाहीत. यामुळे त्यांची स्थिती अधांतरी होते. त्यांना कोणतेच मूलभूत प्रश्न वा समस्या कळत नाहीत. आज आपल्याकडे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते अशामुळेच निर्माण झाले आहेत. कुणाही व्यक्तीला जे आकलन होते, ते मातृभाषेतूनच होते, हे युनेस्कोच्या अहवालातही मान्य केले गेले आहे, असे नेमाडे म्हणाले.
‘मी परंपरेचे जे समर्थन करतो ते नीरक्षीरविवेकाने परंपरेचा अर्थ लावण्याच्या बाबतीत म्हणतो आहे. कुठल्याही माणसाला तो ज्या घरात जन्मतो, ज्या धर्मात जन्मतो, ज्या प्रदेशात जन्मतो, तिथली शेकडो वर्षांची परंपरा त्याला आपसूक वारशाने मिळते. ही परंपरा अनेक विद्वान, बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी वैचारिक मंथन करून आणि संघर्ष करून घडवलेली असते. त्यातले स्वत्व कोणते आणि फोलपटे कोणती, हे ज्याने त्याने ठरवायचे असते. त्यानुसार परंपरेचा धागा पुढे नेणे अपेक्षित असते. या अर्थाने मी परंपरेचे महत्त्व मानतो, याचा अर्थ परंपरेतल्या हीन गोष्टींना माझा पाठिंबा आहे, असे मानणे चुकीचे आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मराठी साहित्यिकांना त्यांची योग्यता असूनही ज्ञानपीठ न मिळाल्याची केवळ दोनच उदाहरणे आहेत, एक म्हणजे जी. ए. कुलकर्णी आणि दुसरे विजय तेंडुलकर. परंतु यालाही आपणच कारणीभूत आहोत,’ असे सांगून नेमाडे म्हणाले की,‘कन्नड नाटककार गिरीश कार्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा विजय तेंडुलकर यांचेही नाव चर्चेत होते. परंतु, ज्ञानपीठ कमिटीला शिफारस करणाऱ्या मराठीच्या प्रतिनिधींना तेंडुलकरांचे कर्तृत्व ठोसपणे मांडता न आल्याने त्यांना हा पुरस्कार मिळू शकला नाही.’