पूर्व द्रुतगती मार्गावरुन वांद्रे-कुर्ला संकुल येथे लवकरात लवकर पोहचता यावे यासाठी बांधल्या जात असलेल्या उन्नत पुलाचे(बीकेसी कनेक्टर) काम सप्टेंबरनंतरच पूर्ण होणार आहे. या मार्गावरील बहुतांश गर्डरचे काम पूर्ण होत आले असून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे पावसाळा संपल्यावर करण्यात येईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती मार्गावरून शीवनजीकच्या सोमय्या मैदान येथून ‘बीकेसी कनेक्टर’ म्हणून ओळखला जाणारा हा उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानक आणि मिठी नदीवरून थेट वांद्रे-कुर्ला संकुलात उतरणार आहे.

हा उन्नत मार्ग चुनाभट्टी येथे हार्बर रेल्वे मार्ग आणि शीव-कुर्लाच्या मध्ये मध्य रेल्वेच्या मार्गावरून जात आहे. या दोन्ही रेल्वे मार्गावरील गर्डरचे काम २३ मे रोजी पूर्ण करण्यात आले होते. रेल्वे मार्गावरील टप्प्यासाठी एकूण १०८० टन वजनाचे १२ गर्डर यामध्ये वापरण्यात आले आहेत. त्यानंतर लवकरच हा मार्ग खुला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम हाती न घेण्याचा संकेत पाळण्याचे प्राधिकरणाने ठरवले आहे. यापूर्वी लालबाग येथील उड्डाणपुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात करण्यात आले होते. परिणामी त्या मार्गावर खड्डे पडले होते. त्यामुळे  ‘बीकेसी कनेक्टर’च्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यानंतरच करण्यात येईल , असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे पूर्वला जाण्यासाठी शीव सर्कलमार्गे धारावी टी जंक्शन पार करावे लागते. येथे होणारी वाहतूक कोंडी टळून अंतर आणि वेळ वाचावा यासाठी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.  त्यामुळे एकूण तीन किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे.

शीव पुलाचे बेअिरग बदलण्याचे काम ऑगस्टमध्ये

* डिसेंबरपासून रखडलेले शीव उड्डाणपुलाचे बेअिरग बदलण्याचे काम जून-जुलै महिन्यात सुरू होणार होते, मात्र बेअिरग तयार होत असून ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

* या पुलाच्या सांध्यामध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे १७० बेअिरग बदलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. आता हे काम ऑगस्टमध्ये सुरू केले जाणार आहे.  त्या काळात सुमारे तीन ते चार आठवडे पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.

* बीकेसी कनेक्टर लवकर पूर्ण झाला असता तर उड्डाणपुलाच्या कामादरम्यान शीव सर्कल येथे होणारी वाहतूक कोंडी टळू शकली असती. मात्र दोन्ही ठिकाणी काम लांबल्यामुळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात शीव परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता आहे.