News Flash

खात्यावरील रक्कम चोरण्यासाठी मजुराकडून साथीदाराची हत्या

मनोजच्या खात्यावर ६५ हजार रुपये आहेत हे पाहिल्यावर साथीदाराचे डोळे फिरले.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या मनोज सिंगने (३२) एटीएम केंद्रातून पैसे काढणे, खात्यावर किती रक्कम जमा आहे हे पाहणे यासाठी साथीदाराची मदत घेतली. मनोजच्या खात्यावर ६५ हजार रुपये आहेत हे पाहिल्यावर साथीदाराचे डोळे फिरले. मनोजच्या डेबिट कार्डचा पिन नंबर माहीत होताच साथीदाराने मनोजची हत्या केली.

बीकेसी पोलिसांनी झारखंडहून शादाब अन्सारी ऊर्फ राहुल (२३) या मनोजच्या साथीदाराला अटक केल्यानंतर हत्येमागील हेतू उघड झाला. संकुलातील खासगी कंपन्यांनी हाती घेतलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मनोज पर्यवेक्षक होता आणि मजुरीही करत होता. त्याच्या हाताखाली २० ते २५ मजूर होते. मनोज या सर्वामध्ये कामाची विभागणी करायचा. दहावीपर्यंत शिक्षण झालेला शादाब मनोजच्या हाताखालचाच मजूर. पण जास्त शिकलेला शादाब मनोजच्या जवळचा होता. अशिक्षित असल्याने बँकेचे व्यवहार मनोज दुसऱ्याच्या मदतीने करायचा. दोन आठवडय़ांपूर्वी बँकेत किती रक्कम जमा आहे, हे पाहण्यासाठी मनोज शादाबला सोबत घेऊन एटीएम केंद्रात गेला. त्याने शादाबच्या हाती कार्ड दिले आणि चार अंकी पिन नंबरही सांगितला. त्यानुसार शादाबने यंत्रावर प्रक्रिया करून खात्यावर ६५ हजार रुपये जमा आहेत हे सांगितले. त्याच दिवसापासून त्याने मनोजचे कार्ड चोरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कार्ड मिळवण्यासाठी मनोजच्या हत्येचा विचार शादाबच्या मनात घोळू लागला. ४ मे रोजी मनोज एकटा असताना शादाबने सळीचे घाव घालून त्याची हत्या केली. अर्ध्या तासाने एका एटीएम केंद्रातून शादाबने दोनदा पैसे काढले. उपायुक्त अनिल कुंभारे, साहाय्यक आयुक्त अरुण माने, वरिष्ठ निरीक्षक कल्पना गाडेकर यांच्या मार्गदशनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 2:46 am

Web Title: bkc police arrested a labourer for murdering the site supervisor
Next Stories
1 पश्चिम रेल्वेवर पाणी तुंबणारी सात ठिकाणे
2 एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांनाही ‘आरटीई’मध्ये प्रवेश
3 अभियंत्यांपाठोपाठ शिक्षकही बेरोजगार
Just Now!
X