07 April 2020

News Flash

काळी-पिवळीचीही घरबसल्या ‘बुकिंग’

ओला-उबरच्या गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी टॅक्सी अनेकांचा आधार होती.

 

मुंबईत ओला आणि उबर या अ‍ॅपवर चालणाऱ्या टॅक्सीप्रमाणे लवकरच काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे बुकिंगही घरबसल्या करता येणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. काळी-पिवळी टॅक्सीसाठीचे ‘आमची ड्राईव्ह’ हे अ‍ॅप येत्या १ जूनला सुरू होणार आहे.

ओला-उबरच्या गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी टॅक्सी अनेकांचा आधार होती. मात्र काळया-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी खाजगी ओला-उबरला पसंती देणे सुरू केले. त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर संक्रात आली आहे.

आता पारंपरिक टॅक्सीचालकांचा धंदा सावरण्याकरिता ‘मुंबई टॅक्सी मेन्स युनियन’ सरसावली आहे. बंगळुरू स्थित सन टेलिमॅटिक्स या कंपनीने मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी ‘आमची ड्राईव्ह’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत ते उपलब्ध असेल. ओला-उबरच्या तुलनेने कमी दरात टॅक्सी उपलब्ध होईल. मुंबईत सुमारे ४० हजार टॅक्सीचालक असून या सर्वाना मे महिन्यात या अ‍ॅपच्या वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येकी २५ जणांच्या एका गटामध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वातानुकुलित व बिगर वातानुकूलित अशी दोन्ही सेवा यापुढे काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या माध्यमातून मिळणार आहे.

या अ‍ॅपच्या निर्मितीचा संपूर्ण खर्च सन टेलिमॅटिक्स कंपनीने उचलला आहे. याच्या मदतीने आम्ही प्रवाशांना ओला-उबरच्या तुलनेत अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बिगर वातानुकुलित टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर १४ ते १५ रुपये तर वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रवाशांना प्रति किलोमीटर १६ रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच हे अ‍ॅप टॅक्सीचालकांना मोफत डाऊनलोड करता येईल. प्रवाशांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी ५ रुपये सेवा कर लागणार आहे. १ जूनपासून जवळपास २ हजार टॅक्सी या अ‍ॅपद्वारे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सी मेन्स युनियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2017 1:23 am

Web Title: black and white cabs booking in mumbai amchi drive app
Next Stories
1 निवृत्तीनंतरही डॉ. वेळुकरांमागील शुक्लकाष्ट सुरूच!
2 ‘शिफू’चा म्होरक्या सुनील कुलकर्णीच्या पोलीस कोठडीत वाढ
3 नेटकरांना भारतीय भाषांचे आकर्षण
Just Now!
X