रेल्वे मंत्रालयाकडून टाळेबंदीत १ जूनपासून विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या. मात्र या गाडय़ा सेवेत येण्याआधीपासूनच दलालांनी अनधिकृतरीत्या ऑनलाइन तिकीट आरक्षण केल्याचे उघडकीस आले आहे. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात पश्चिम आणि मध्य रेल्वेतील सुरक्षा दलांनी मोहीम उघडली असून, मुंबई विभागात २६ जून ते १५ जुलैपर्यंत के लेल्या कारवाईत १०० दलालांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे ५५ लाख रुपये किमतीची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. १२ मेपासून देशभरात ३० विशेष रेल्वे गाडय़ा सुरू झाल्या. यामध्ये फक्त पश्चिम रेल्वेच्या मुंबईतूनही गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. तर १ जूनपासून देशभरातून २०० रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या.