करोना संसर्गावर उपचारांसाठी वापर होणाऱ्या टोसिलीझुमाब औषधाची काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी आलेल्या उत्तराखंड येथील एका तरुणाला गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाने अटक केली. त्याच्याकडून या औषधाच्या १५ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.

वांद्रे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत उत्तराखंडहून मुंबईत आलेल्या तरुणाची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करून पथकाने वांद्रे रेक्लेमेशन परिसरात सापळा रचून या तरुणाला अटक केली. त्याचे नाव आझम नासीन खान (३०) असे असून उत्तराखंड येथे तो मुखपट्टय़ा विक्रीचा व्यवसाय करत होता.  दिल्लीतील एका व्यक्तीने त्याला टोसिलीझुमाबचा साठा उपलब्ध करून दिला.

‘दिल्लीतील व्यक्ती आणि आझम मित्र आहेत. औषधांचा साठा या व्यक्तीनेच उपलब्ध करून दिला ही अटक आरोपीने दिलेली माहिती तपासली जाईल. त्यात तत्थ्य असल्यास दिल्लीतील संशयिताला अटक केली जाईल,’ असे तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.