मुंब्रा भागातील लकी कंपाऊंड परिसरात घडलेल्या दुर्घटनेचे खापर आपल्यावर फुटू नये, यासाठी ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू असून ‘ती’ इमारत उभी करण्यात आलेली जागा ‘आमची नाही, तर वन खात्याची’ असा बचाव महापालिकेने शुक्रवारी केला. ठाणे महापालिका हद्दीत येणाऱ्या वन खात्याच्या जमिनीवर मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असून त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही, अशी भूमिका दिवसभर महापालिकेचे अधिकारी घेत होते. दरम्यान, ही जागा खासगी मालकीची असून बिल्डर जमील कुरेशी यांच्या नावे असलेला जमिनीचा सातबारा उतारा याप्रकरणी यापूर्वी तक्रार दाखल करणारे या भागातील रहिवासी मंगल पाटील यांनी सायंकाळी उशिरा पत्रकारांपुढे सादर केल्याने एकच खळबळ उडाली. दुर्घटनाग्रस्त इमारत उभी असलेली काही जागा वन विभागाची असली तरी खासगी जागेचा यामध्ये समावेश असल्याच्या आरोपामुळे महापालिकेची भूमिका नव्या वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ही इमारत उभी राहत असताना वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने घेतलेली बघ्याची भूमिका आता वादात सापडू लागली असून मुंब्रा, कौसा, दिवा भागात मोठय़ा संख्येने उभ्या राहत असलेल्या अनधिकृत बांधकामांची जबाबदारी महापालिका कशी झटकू शकते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. मुंब्रा, दिवा तसेच आसपासच्या भागांमध्ये मोठय़ा संख्येने उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवी नाहीत. दिवा परिसरातील एका अनधिकृत चाळीवरील कारवाई टाळण्यासाठी महापालिकेचे सहायक आयुक्त घनश्याम थोरबोले यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना ठाणे विभागाच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. थोरबोले यांच्या ‘लाचप्रतापांमुळे’ गेल्या अडीच वर्षांपासून शहरातील अतिक्रमणांविरोधात धडाकेबाज कारवाई करणारे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या प्रयत्नांना एकप्रकारे हरताळ फासला गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात उघडपणे सुरू झाली होती. अनधिकृत चाळ वाचविण्यासाठी थोरबोले यांच्यासह दोघा पोलीस हवालदारांना या वेळी अटक करण्यात आली होती. अनधिकृत बांधकामांना अभय देण्यासाठी झालेली महापालिका आणि पोलिसांची ही अभद्र युती यापूर्वीच चव्हाटय़ावर आली असताना गुरुवारी झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी झटकण्यासाठी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटापिटा सुरू केल्याने ठाणेकर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या संरक्षित क्षेत्रात उभ्या राहत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार आमचे नाहीत, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. गेल्या वर्षी ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यात वन विभागाला पत्र पाठवून त्यांच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे निष्काषित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वन विभागाने महापालिकेच्या पत्राकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही माळवी यांनी केला. लकी कंपाऊंड येथे उभ्या राहत असलेल्या इमारतीविषयी वारंवार तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्याने २६ मार्च रोजी कारवाईची नोटीस बजावली होती, असेही त्यांनी सांगितले.

लहानगे बचावले.. नातेवाईकांचा शोध सुरू
’  या इमारतीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी तीन लहानग्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती निवारण पथकास यश आले आहे. त्या वेळी तिथे उपस्थित नागरिकांनी भावूक होऊन अक्षरश: टाळ्या वाजवल्या. करण जैयस्वाल हा अडीच वर्षांचा मुलगा या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रभर त्याच्या पालकांचा शोध लागला नव्हता. अखेर सकाळी त्याचे वडील सूरज जैयस्वाल  मुलाचा शोघ घेत रुग्णालयात आले. इमारत कोसळली तेव्हा सूरज जैयस्वाल कामावर होते. घरात त्यांची पत्नी कलावती, पाच वर्षांची मुलगी नीतू आणि करण होते. कामावरून आल्यावर त्यांनी इमारत कोसळल्याचे कळले. रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळी त्यांना करण सापडला, पण अद्याप पत्नी आणि मुलगी सापडलेली नाही.
या ढिगाऱ्याखाली दहा महिन्यांची एक मुलगी सापडली असून तिच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अद्याप तिच्या नातेवाईकांचा शोध लागू शकलेला नाही. सध्या रुग्णालयातील सुरक्षा रक्षक, आरोग्य सेवक आणि परिचारिका तिचा सांभाळ करीत आहेत.
’ जिल्हा शासकीय रुग्णालयात संध्या ही चार वर्षांची मुलगी उपचार घेत आहे. तिच्या डोळ्यात मोठय़ा प्रमाणात वाळू गेली आहे. रात्रभर तिच्या नातेवाईकांचा शोध लागला नव्हता. सकाळी तिची आई या अपघातात मृत झाल्याचे कळले.
’  हसीना मझहरउद्दिन शेख नावाची नऊ वर्षांची मुलगी जिल्हा रुग्णालयातच उपचार घेत असून घटना घडली त्या वेळी तिची आई, दोन बहिणी, दोन भाऊ घरात होते आणि वडील कामाला गेले होते. मात्र तिच्या कुटुंबीयांपैकी कुणाचाही ठावठिकाणा अद्याप सापडू शकलेला नाही.

आक्रोश.. किंकाळ्या आणि धावपळ
आक्रोश.. किंकाळ्या.. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली धडपड.. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी सुरू असलेली रुग्णवाहिकांची धावपळ.. असे काहीसे चित्र गुरुवारी संध्याकाळी शीळ भागात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अनधिकृत बहुमजली इमारत कोसळल्यानंतर होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी धाव घेऊन  एकीकडे अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने ढिगाऱ्याखाली सापडलेल्या जखमींचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच दुसरीकडे बचाव कार्य सुरू केले. महापालिकेचे आपत्ती निवारण केंद्राचे पथकही कार्यरत होते. अवघ्या दीड महिन्यात उभ्या करण्यात आलेली आठ मजली अनधिकृत इमारत गुरुवारी संध्याकाळी कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या आठ मजली इमारतीतील ३६ खोल्यांमध्ये रहिवासी राहत असल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त होत होती. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी इमारतीच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.
    
शेजारीही धास्तावले
लकी कमपाऊंडमध्ये बांधकाम व्यावसायिक जमील कुरेशी आणि सलीम शेख यांनी जणू काही अनधिकृत इमारतींचे संकुलच उभे करण्याचा सपाटा लावला होता. कोसळलेल्या इमारतीलगतच सात मजली इमारत असून तिचे काम पूर्ण झाले आहे. कालच्या घटनेनंतर या इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांनी घरे खाली करून इतरत्र आसरा घेतला आहे. ही इमारतही धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या इमारतीच्या समोरच अनधिकृत इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. या संकुलात जाण्यासाठी नाल्यावर टाकण्यात आलेला भला मोठा पूलही धोकादायक असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे अनधिकृत इमारतींमध्ये राहणारे नागरिक धास्तावले आहेत.