संदीप आचार्य

करोनामुळे अनेक खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले असताना सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलीफोन ऑपरेटर म्हणून काम करणारे राजू चव्हाण हे एक दिवसही रजा न घेता गेले तीन महिने कामावर हजर राहून कर्तव्य बजावत आहेत. अंध असूनही रुग्णसेवेचा राजू यांचा ‘दृष्टिकोन’ अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला आहे.

शासकीय परीक्षा दिल्यानंतर २००९ पासून राजू चव्हाण सेंट जॉर्ज रुग्णालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. ते जोगेश्वरी परिसरात राहतात. टाळेबंदी जाहीर झाल्यापासून ते अत्यावश्यक सेवेअंतर्गत असलेल्या बसने सेंट जॉर्ज रुग्णालयात कामाला येतात. यासाठी घरून बस स्थानकापर्यंत जायचे. अंधेरी स्थानकापर्यंत एक बस, तेथून बस बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी दुसरी बस पकडायची. तिथे उतरल्यानंतर चालत सेंट जॉर्ज रुग्णालय गाठायचे. घरी येताना दादरसाठी बस पकडायची आणि तेथून अंधेरीला जाणारी दुसरी बस पकडायची. त्यानंतर अंधेरी पश्चिमेहून पूर्वेला यायचे आणि पुन्हा तिसरी बस पकडून घरी जायचे. असा द्राविडी प्राणायाम राजू रोजच करत आहेत.

आपल्या कामाबद्दल राजू सांगतात, एरवीही रुग्णालयात सतत दूरध्वनी येतच असतात; पण करोनाच्या साथीच्या काळात तर सगळेच दूरध्वनी सातत्याने खणखणत असल्याने क्षणभरही विश्रांती नाही. त्यातच पाच ऑपरेटरपैकी दोघेच उपस्थित राहत होतो. अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी पर्यायी व्यवस्था केल्यामुळे आता चार जण कार्यरत आहोत. करोनाग्रस्तांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचारी यांच्यासाठी सातत्याने दूरध्वनी येत असतात. अनेक जण माहिती, मार्गदर्शन घेण्यासाठीही फोन करतात. टेलिफोन ऑपरेटर म्हणून या काळात अनेक रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यापासून ते रुग्णवाहिका मिळवून देण्यापासून खूप मदत करू शकलो याचाच मला आनंद आहे. आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाल्याने माझा येण्याजाण्याचा त्रास कमी झाल्याचे राजू सांगतात.

या अंध योद्धय़ाचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा शब्दांत सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे आपल्या भावना व्यक्त करतात. सध्या रुग्णालयात करोना रुग्णांसाठीच्या २२० खाटा झाल्या आहेत, तर अतिदक्षता विभागात ९२ खाटा आहेत. याशिवाय करोना रुग्णांसाठी १२ डायलिसीस मशीन आहेत. त्यामुळे टेलिफोन ऑपरेटरचे काम हेही एक आव्हानच आहे. नियमानुसार अपंग म्हणून कामावर येण्यासाठी सूट असतानाही राजू रोज कामावर येत आहेत. सर्वानाच मदत करण्याचा त्यांचा दृष्टिकोन सर्वानाच विचार करायला लावणारा असल्याचे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.