जन्मांध असलेला इर्शाद तसा दुर्दैवीच. आई लहानपणीच गेली, वडिलांनी दुसरे लग्न केल्यावर सावत्र आई आणि जन्मदात्या वडिलांनीच छळ सुरू केला. जगणे असह्य़ असतानाच अंधशाळेत बासरीच्या सुरांनी कवेत घेतले. शाळा सुटली आणि जीवनाच्या कठोर परीक्षेला सामोरे जावे लागले. गेली सात वर्षे दादर रेल्वेस्थानकावरील सहा क्रमांकाच्या फलाटावरील जिन्याने जगण्यासाठी आधार दिला. तिथे इर्शादच्या बासरीचे सूर घुमत आहेत आणि त्यातून जगण्याचा सूरही तो शोधत आहे. दररोज अवीटपणे, नव्या उमेदीने!
सध्या वयाच्या पंचविशीत असलेला इर्शाद ऊर्फ सलीम हा कल्याणचा. जन्मानंतर काही काळातच आईच्या मायेला तो पोरका झाला आणि वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर घरातील जिणेही अवघड झाल्याने त्याने घर सोडले. तो हरविला असल्याची रीतसर तक्रार पोलिसांत केली गेली. त्यानंतर मध्यप्रदेश सीमेवर तो पोलिसांना सापडला. त्याची करुण कहाणी ऐकल्यावर पोलिसांचे मन द्रवले आणि त्याला नीट वागविण्याची तंबी देऊनच पोलिसांनी त्याला आईवडिलांच्या हवाली केले. पण त्यातूनही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. इर्शाद बदलापूरच्या प्रगती अंध महाविद्यालयात शिकत होता. त्याचे बालविश्व दु:खाने भरलेले असतानाच त्याला बासरीच्या सुरांची संगत मिळाली. या काळातच त्याने बासरीच्या सुरांना जवळ केले. संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेणे गरिबीमुळे शक्य नव्हते. त्यामुळे कानावर पडतील, ती हिंदूी गाणी त्याने आत्मसात केली. ज्यांनी जे काही शिकविले, ते त्याने शिकून घेतले. अजूनही कुणी मदत केली तर त्याला बासरीवादन शिकायची इच्छा आहे. काही भोजपुरी चित्रपटांत त्याच्या बासरीचा सूर घुमला आहे. हिंदी किंवा अन्यभाषिक चित्रपटांतही त्याला संधी शोधायची आहे. सध्या मन्ना डे, किशोरदा, लतादीदी अशा दिग्गजांची अवीट गाणी बासरीतून साकारत आपल्या जीवनातील सूर शोधण्याचा प्रयत्न इर्शाद अविरत करीत आहे.
नववीत शाळा सुटलेल्या इर्शादने गेली सात वर्षे दादरच्या जिन्यावर बस्तान मांडले आहे. त्याच्या बासरीने नादावलेले रसिक जे काही देतात, त्यातून तो पोट भरतो. रात्री तो कल्याणला घरी परततो. त्याच्यावर एका मुलीचे प्रेम होते. पण तिच्या घरच्यांचा विरोध होता. मला आई नाही, पण तू आईवडिलांना दुखवू नकोस, असे तिला समजावून त्याने तिच्याशी लग्न केले नाही.
इर्शादचे वर्षभरापूर्वी लग्न झाले आहे. त्याची पत्नी आणि मुलगा दृष्टीहीन नाही, हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब आहे. तीन महिन्यांच्या कासीफ या आपल्या मुलाभोवती आता त्याची सर्व आशा एकवटली आहे. त्याला आता कासीफचे आयुष्य घडवायचे आहे. इर्शादला हलके-फुलके संगीत आवडते. कोणाची मदत मिळाली, तर त्यात शिक्षण घेण्याची इर्शादची इच्छा आहे. धकाधकीच्या जीवनात दादर स्थानकावरील धक्काबुक्कीतही ती आशा टिकून आहे. रेल्वेगाडय़ांच्या धडधडत्या चाकांच्या आवाजात इर्शादच्या बासरीचे सूर मिसळत असतात आणि अनेक आव्हानांनी भरलेल्या जीवनाशी सुरेल जुगलबंदी साधत असतात.
इर्शादची बासरी ऐकण्यासाठी loksatta.com/youtube.com ला अवश्य भेट द्या.