News Flash

अंध कर्मचाऱ्यांचा बस प्रवास जिकिरीचा

कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या अंधांना नाइलाजाने लोकलऐवजी बसने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

|| नीलेश अडसूळ

प्रवाशांची गर्दी, मर्यादित बसफे ऱ्या यांमुळे हाल; लोकल सुरू  करण्याची मागणी

मुंबई : कामासाठी घराबाहेर पडणा ऱ्या अंधांना नाइलाजाने लोकलऐवजी बसने प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी, तासन्तास रांगेत रखडपट्टी, मर्यादित बसफे  ऱ्या यामुळे अंध, अपंग कर्मचाऱ्यांची अक्षरश: फरफट होत आहे. बसचा क्रमांक न कळणे, वेगवेगळ्या आकारांच्या गाड्यांमुळे प्रवेशद्वार, आसनव्यवस्थेचा अंदाज न येणे, प्रवाशांकडून धक्काबुक्की अशा नाना अडचणींना तोंड देणारे अंध प्रवासी लोकलने प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत आहेत.

बस प्रवासात येणारे अनेक कटू अनुभव प्रवाशी सांगतात. अंधाच्या शाळेत शिक्षक असलेल्या सुभाष कांबळे यांना दररोज दिवा ते वरळी प्रवास करावा लागतो. ‘वरळी-शीव-खोपट-दिवा असा तीन टप्प्यांत बस बदलून प्रवास करत आहे. बेस्ट, टीएमटी सगळीकडे सारखीच गर्दी असते. अंध असूनही पुढच्या दारातून चढू दिले जात नाही. प्रवासी धक्काबुक्की करतात. बस वेळेवर नसल्याने दोन ते तीन तास गाडीची वाट पाहण्यात जातात,’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

पालिका कर्मचारी निकेत म्हात्रे वडाळा ते दादर प्रवास करतात. बसने प्रवास करताना संघर्ष करावा लागत असल्याचे निकेत यांचे म्हणणे आहे. ‘हा अवघ्या दहा मिनिटांचा टप्पा असला तरी दोन तास आधी घरातून निघावे लागते. कधीही बस वेळेवर येत नाही. गर्दी असेल तर सर्रास खाली उतरवले जाते,’ असे ते सांगतात. तर भांडुप ते कुर्ला प्रवास करणारे जयदीप सिंग यांच्या मते, ‘सामान्य व्यक्ती प्रवासादरम्यान कुठेही उतरले तर सहज पुढचा प्रवास करू शकतात; परंतु अंध व्यक्तींना रस्ते परिचित नसतात. त्यामुळे गाड्या, रहदारी याचा अंदाज नसल्याने दुखापत होते. पूर्वी लोकांचे सहकार्य मिळायचे; परंतु करोनामुळे लोक आम्हाला हात लावायलाही घाबरतात.’

अनेक अंध व्यक्ती स्वत:चा व्यवसाय करतात; परंतु लोकल बंद असल्याने त्यांच्या व्यवसायालाही टाळे लागले आहे. बोरिवलीतील सागर पाटील या अंध तरुणाची ग्रँट रोड येथे विद्युत उपकरणे घडवणारी कार्यशाळा आहे, परंतु लोकल बंद असल्याने सहा महिने ते कामावर जाऊ शकलेले नाही. ‘बोरिवली ते ग्रँट रोड हा लोकल प्रवास ४५ मिनिटांचा असला तरी बसने तीन ते चार तास लागतात. खासगी गाडीने जायचे म्हटले तर हजारो रुपये खर्च होतात. माझे सहकारीही विरार, कल्याण येथून येतात. त्यामुळे तेही कार्यशाळेत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

लोकल सोयीची का?

रेल्वेमध्ये अंध-अपंगासाठी स्वतंत्र डबा असल्याने हक्काची जागा मिळते. शिवाय हा डबा ओळखण्यासाठी एका विशिष्ट आवाजाची व्यवस्था रेल्वे स्थानकात असते. तसेच अंधांना दिसत नसल्याने स्पर्श, आवाज, वास अशा काही संकेतांतून ते रोजचा प्रवास परिचित करून घेतात; परंतु बस रोज विविध आकारांच्या येत असल्याने दरवाजे, पायदान यांचा अंदाज अंधांना येत नाही. शिवाय किती नंबरची बस आली, कोणते ठिकाण आले हे विचारण्यासाठी सतत लोकांचा आधार घ्यावा लागतो. तुलनेने रेल्वे प्रवास सोयीचा असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:57 am

Web Title: blind person best bus travling very hard demand to start local akp 94
Next Stories
1 जम्बो करोना केंद्रांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
2 पावसाने दडी मारल्याने मोडकसागर तलावातील जलपातळीत घट
3 खातेधारकांची घुसमट
Just Now!
X