हल्ली वर्तमानपत्रं उघडले की, मुखपृष्ठाऐवजी जाहिरातींची दोन पानं आणि त्यांवर टोलेजंग गृहप्रकल्पांच्या जाहिराती बघायची आपल्याला सवय झाली आहे. मुंबई आवृत्तीत हे प्रकल्प सहसा आसनगाव, नेरळ, नवीन पनवेल, शीळ फाटा इ. ठिकाणी, म्हणजेच दक्षिण मुंबईपासून ५० ते १०० किमी दूर असतात. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबद, अहमदाबाद ते पुणे… सर्वत्र थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. शहराच्या मध्यावधी भागात नवीन घरांची कमतरता, मोठे आकार, अव्वाच्या सव्वा किमती या सगळ्या घटकांची फलनिष्पत्ती म्हणून अनेक नवीन कुटुंबं स्थिरस्थावर होण्यासाठी उपनगरांची निवड करते. आपल्या स्वतःच्या, प्रशस्त… घरात राहण्यासाठी रोजचा दोन तास घामाने स्नान करायला लावणारा लोकल अथवा बसचा प्रवास आणि स्वतःची गाडी असली तरी ताटकळत ठेवणारे ट्रॅफिक जाम सहन करणे हल्लीच्या पिढीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. स्वतःच्या मालकीचे घर ही गोष्टं हल्ली मुलांच्या ‘विवाह जुळवणाऱ्या’ संकेतस्थळांवरील परिचयपत्रात शिक्षण किंवा नोकरीपेक्षा मोठी ठरते. स्वतःचे घर नसणाऱ्या बऱ्याच मुलांना लग्न ठरताना आपण घर कसे आणि कुठे घेणार आहोत याची पंचवार्षिक योजना मांडावी लागते. भारतातच नाही तर थोड्या-फार फरकाने जगभरात सर्वत्र अशीच स्थिती गेल्या अनेक दशकांपासून आहे.
पण आता स्मार्ट शहरांच्या युगात या परिस्थितीमध्ये मोठी स्थित्यंतरं होताना दिसत आहेत. १९९०च्या दशकात म्हणजे जागतिकीकरणाच्या युगात जन्मलेली किंवा मोठी झालेली (मिलेनिअल) पिढी मोबाइल, इंटरनेट आणि त्यावर आधारित विविध उपकरणांत (आयपॉड, टॅबलेट, प्ले स्टेशन, स्मार्ट घड्याळं आणि बॅंड इ.) यांत गुरफटून गेली आहे. ‘जेव्हा झोपलेले नसतात, तेव्हा ऑनलाइन असतात’ या एका वाक्यात त्यांच्यापैकी अनेकांचे वर्णन करता येईल. वर्षानुवर्षे इंटरनेट माहितीच्या महापुरामुळे समृद्ध होत असून या माहितीवर आधारलेल्या स्टार्ट-अप कंपन्या आता अनेक अकल्पित गोष्टी आणि सेवा आपल्या मोबाइलद्वारे उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे पूर्वी काही महत्त्वाची खरेदी असो वा पर्यटन… या गोष्टींसाठी अनेक आठवड्यांची तयारी चालायची. आता या गोष्टी काही तासांच्या तयारीवर आल्या आहेत. अचानक सुट्टी लागून आली आणि इंटरनेटवर डील आहे हे पाहून (व्हिसा असेल तर अथवा लागत नसेल तर) दोन दिवसांच्या अवधीत ही पिढी परदेश वारी करू लागली आहे. आज मोबाइल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे एका वर्षात कालबाह्य ठरू लागली आहेत.
पैसे खर्च न करताही जीवन समृद्ध करण्याचे अनेक पर्याय या पिढीच्या हातात आहेत. किंडलच्या माध्यमातून जगभरातील लाखो पुस्तकांचे भांडार आता महिना १५० रूपये इतक्या वाजवी मूल्यात तुम्हाला उपलब्ध आहे. मल्टिप्लेक्स परवडत नसेल तर टोरेंट किंवा यु-ट्यूबच्या माध्यमातून कधीही आणि कुठेही (स्थळ आणि काळ) प्रदर्शित झालेला सिनेमा/नाटक किंवा मालिका आपण डाउनलोड करून बघू शकता. टीव्हीवरही शेकडो वाहिन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वी तिशीत शिरल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि या सगळ्या माध्यमांची अनुपलब्धता यामुळे नवीन काही शिकायची/करायची ओढ कमी व्हायची पण आजची पिढी अधिक स्वतंत्र आणि फारच अधिक आत्मकेंद्रित असल्यामुळे त्यांना नवीन करण्याच्या ओढीपोटी (त्यांच्या दृष्टीने) अनावश्यक जबाबदाऱ्या अंगावर घ्यायला आवडत नाहीत.
आता या अनावश्यक गोष्टींच्या यादीत स्वतःचे प्रशस्त घर याही गोष्टीचा समावेश होऊ लागला आहे. या पिढीतील अनेकांच्या दृष्टीने उपनगरात किंवा उपग्रह नगरांत दूर कुठेतरी स्वतःचे हक्काचे असे घर विकत घेण्यासाठी २० वर्षं मुदतीचे कर्ज काढून आपला किंवा आपल्या जोडीदाराचा आख्खा पगार त्याचे हफ्ते फेडण्यात खर्ची घालणे हे बिनडोकपणाचे लक्षण आहे. दिवसाचे १०/१२ तास काम करायचे आणि त्यासाठी दिवसाचे ३/४ तास प्रवासात खर्ची घालायचे म्हटले की, स्वतःच्याच घरात तुम्ही रात्री झोपण्यापुरते जाणार हे उघड आहे. मोठे घर म्हणजे अधिक पसारा, केर काढण्यासाठी किंवा स्वच्छता ठेवण्यासाठी अधिक कष्टं, त्यात सजावट / दुरूस्ती यासाठी द्यावा लागणारा वेळ म्हणजे नसत्या उठाठेवी आहेत अशी वृत्ती बळावू लागली आहे. त्यामुळे या पिढीतील अनेक लोक उपनगरात स्वतःचे वेगळे घर घ्यायच्या ऐवजी शहरातील भाड्याच्या घरांना पसंती देऊ लागले आहेत. घर आकाराने छोटे असले तरी चालेल पण शहराच्या मध्यवर्ती भागात हवे आणि रेल्वे स्टेशन, शाळा, मॉल, हायवे, चांगली उपहारगृह आणि करमणुकीच्या ठिकाणांहून हाकेच्या अंतरावर असायला हवे. भारतातील महानगरांत स्वस्त पेट्रोलमुळे गाड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसत असली तरी पाश्चिमात्य जगात तरूण पिढीचा कल कार शेअरिंग, सार्वजनिक वाहतुकीचा वापर ते अगदी सायकल किंवा चालत ऑफिसला जाण्याकडे झुकताना दिसत आहे. हा वाचलेला पैसा मग पर्यटन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि हॉटेलिंगवर खर्च होतो आहे.
या बदलणाऱ्या कलामुळे आता गृहनिर्माण कंपन्याही शहराच्या मध्यभागी स्टुडिओ अपार्टमेंट बांधू लागली आहेत. पूर्वी अशा ठिकाणी अतिश्रीमंतांनाच परवडू शकतील अशी घरं बांधली जायची. अमेरिकेत जनरेशन वायची संख्या आता ८ कोटी म्हणजेच देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे २५% झाली असून लग्नं आणि मुलं झाल्यावर, म्हणजेच आणखी ५-१० वर्षांनंतर ही पिढी शहराच्या मध्यावधी भागातच रहाणं पसंत करते का मागील पिढीप्रमाणे उपनगरांकडे प्रस्थान करते यावर तेथील गृहनिर्माण क्षेत्राचे भवितव्य अवलंबून आहे.
मुंबईसारख्या शहरात हा कळीचा मुद्दा आहे. गेली अनेक वर्षे एकीकडे मध्यमवर्गियांना शहरात स्वतःचे घर घेणे परवडत नाही तर दुसरीकडे मोठ्या आकाराची सुमारे लाखभर घरं विक्रीअभावी पडून आहेत. शहरात लहान आकाराची घरं फक्त झोपडपट्टी पुनर्निमाण योजनेअंतर्गत बनत असून ती बाहेरच्यांना विकता येत नाहीत. त्यात बेकायदेशीर मार्गाने भाड्याने रहायचे ठरवले तरी आजच्या तरूण पिढीला अपेक्षित सोयीसुविधा तिथे उपलब्ध नसल्यामुळे शहराच्या मध्यापासून ५० ते १०० किमी अंतरावर घर घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.
विकसित देशांत दिसू लागलेला जनरेशन वायच्या दक्षिणायनाचा कल आपल्याकडेही दिसू लागला तर त्याचे आपल्याकडील गृहनिर्माण क्षेत्रावरील दूरगामी परिणाम होतील. इ-कॉमर्सच्या बोलबाल्यामुळे शहराच्या मध्यावर्ती भागात पाण्यासारखा पैसा ओतून नवीन मॉल किंवा शॉपिंग कॉंप्लेक्स बांधणं विकासकांना परवडनेसाचं झालं आहे. दुसरीकडे सरकार गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात यशस्वी झाले तर मुंबईत बीडीडी चाळी, चॅरिटेबल ट्रस्ट आणि झोपडपट्ट्यांनी व्यापलेली जमीन हजारो एकर जमीन मोकळी होणार आहे. त्यामुळे या जमिनींवर उत्तम सोयीसुविधांनी युक्त पण छोट्या आकाराच्या घरांचे प्रकल्प उभे राहू शकतात. असे झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताणही हलका होईल. स्मार्ट शहरांत वाहतूक व्यवस्थेतही क्रांतिकारी बदल घडून येत आहेत. त्याचा आढावा घेऊया पुढील लेखात.
– अनय जोगळेकर