खासगी रुग्णालयातही आता रक्तदान शिबिरांचे आयोजन

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताकरिता करावी लागणारी वणवण थांबण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार आता खासगी रुग्णालयांनाही रक्तदान शिबिरे घेता येणार आहेत. मुंबईतील पाच मोठय़ा रुग्णालयांनी याला प्रतिसाद देत शिबिरांचे आयोजन करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे येत्या काळात या रुग्णालयांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होऊन रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी करावी लागणारी वणवण थांबण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मे महिन्यातच मुंबई व उपनगरातील खासगी रुग्णालयांनी प्रतिसाद देत रक्तदान शिबिरे घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. यामध्ये वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट, गोरेगावातील फोर्टिस रुग्णालय, परळमधील ग्लोबल रुग्णालय, पालघरमधील वेदांत इन्स्टिटय़ूट, नवी मुंबईतील अपोलो रुग्णालय या रुग्णालयांच्या रक्तपेढय़ांचा समावेश आहे. त्यांना राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तदान शिबिरे घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दादर येथील आशीर्वाद, कुल्र्यातील कोहिनूर, अंधेरीतील सेव्हन हिल्स, ठाण्यातील ज्युपिटर या रुग्णालयांनी अजूनही प्रतिसाद दिलेला नाही, असे परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.

सरकारी, निमसरकारी, पालिका, विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांना आतापर्यंत रक्तशिबिरांचे आयोजन करता येत होते. मात्र नव्या बदलामुळे खासगी रुग्णालयांनाही आवश्यकतेनुसार शिबिरांचे आयोजन करता येईल. मात्र यासाठी या रुग्णालयांना रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवश्यक तांत्रिक ज्ञान असलेल्या ८ ते १० कर्मचाऱ्यांची भरतीही करावी लागणार आहे, असेही डॉ. थोरात यांनी नमूद केले.

विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांबाबत साशंकता

विविध विश्वस्त संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांना आधीपासून रक्तदान शिबिरे भरवण्याची परवानगी आहे. मात्र या रुग्णालयांतील रक्ताचा साठा, शिबिरांचे आयोजन कधी करावे यावर नियंत्रण ठेवण्याबाबत नियमावली नाही. त्यामुळे अनेकदा या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळवण्यासाठी किंवा रक्तदाता शोधण्यासाठी वणवण करावी लागते. तसे पाहता रुग्णालयांनीच रुग्णाला रक्त उपलब्ध करून देणे बंधनकारक असते; परंतु दररोज रुग्णालयात रक्त न मिळाल्यामुळे रक्ताची किंवा रक्तदात्याची मागणी करणारे अनेक जण येतात. केंद्राच्या नव्या बदलामुळे खासगी रुग्णालयांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची परवानगी मिळाली असली तरी ही रुग्णालये रक्तदान शिबिरे आयोजित करतील आणि रुग्णांपर्यंत रक्त उपलब्ध होईल याबद्दल साशंकता आहे, असे मत या थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी व्यक्त केले.

विश्वस्त संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयातील रुग्णांना प्रथम त्या रुग्णालयाच्या रक्तपेढय़ांमधून रक्त उपलब्ध होणे आवश्यक असते. रुग्णांना बाहेरून रक्तदाता आणण्यास सांगणे चुकीचे आहे. मात्र याबाबत रुग्णांकडून तक्रार केली जात नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून रक्तपेढय़ांना नोटीस पाठवणे किंवा परवाना रद्द करणे आदी कारवाई करता येत नाही. त्यामुळे यापुढे रुग्णालयांकडून रक्त उपलब्ध केले जात नसेल तर रुग्णांनी वा नातेवाईकांनी ‘राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे’कडे याची लेखी तक्रार करावी. यावर तातडीने कारवाई केली जाईल.

डॉ. अरुण थोरात, साहाय्यक संचालक, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद