रक्तदान शिबीर, वृक्षलागवड, करोनायोद्धे, गोविंदांचा सत्कार

मुंबई : ‘लाख’मोलाच्या दहीहंडय़ांवरून आयोजकांमध्ये सुरू असलेली चढाओढ, हंडय़ा फोडून पारितोषिके  पटकावण्यासाठी दिवसभर फिरणारी गोविंदा पथके , दहीहंडी फोडतानाचा थरार आणि मंचावरचे सेलिब्रिटी पाहण्यासाठी जमणारे लाखो प्रेक्षक हे वर्षांनुवर्षांचे गोकु ळाष्टमीचे स्वरूप यंदा करोनामुळे पार बदलून गेले. अनेक गोविंदा पथकांनी रक्तदान शिबीर, वृक्ष लागवृड, ज्येष्ठ गोविंदा – प्रशिक्षकांचा सन्मान करीत यंदाचा दहिकाल्याचा उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे काही ठिकाणी गोविंदा पथकांनी करोनाचे संकट निवारण्याचे गाऱ्हाणे घालत मानाची दहीहंडी फोडली.

यंदा करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन दहीहंडी समन्वय समितीने यंदा गोपाळकाला उत्सव साजरा करू नये असे आवाहन मुंबईतील समस्त गोविंदा पथकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गोविंदा पथकांनी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी मुंबईतील एकाही पथकाने गोविंदा काढला नाही. मात्र सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत गोविंदा पथकांनी मंगळवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला.

यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर आयोजकांनी शांत बसणेच पसंत केले आहे. असे असले तरी  गोपाळकाल्याच्या  दिवशी – बुधवारी मुंबईतील बहुसंख्य गोविंदा पथकांतील निवडक गोविंदांनी सरावाच्या ठिकाणी जमून मानाची दोन थराची दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. तत्पूर्वी करोनाचे संकट निवारण्याचे गाऱ्हाणेही गोविंदांनी घातले. यंदा दहीहंडी फोडण्यासाठी कुठेही जाता येणार नाही याच कल्पना असलेल्या गोविंदा पथकांनी रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, ज्येष्ठ गोविंदा – प्रशिक्षकांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ आणि मातृभूमी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात तब्बल ११३ गोविंदा पथके सहभागी झाली होती. या सर्वानी मुंबईत २५ ठिकाणी दोन हजार झाडांची लागवड केली. तसेच दहीहंडी न फोडता गोविंदा पथकांनी समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविली. रक्तदान शिबीर आणि करोना योद्धय़ांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.