सामाजिक संस्था, उत्सव मंडळे यांचा पुढाकार

मुंबई : राज्यात सध्या रक्ताची नितांत गरज असल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तदान होणे गरजेचे आहे. परंतु १ मेपासून १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण होणार असल्याने रक्तसाठय़ाबाबत चिंता व्यक्त केली जात होती. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून तरुणांकडून लसीकरणापूर्वीच रक्तदानाला सुरुवात झाली आहे. विविध सामाजिक संस्था, गृहसंस्था, उत्सव मंडळे यांच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात तरुणांना रक्तदानासाठी आवाहन केले जात आहे.

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासने गेल्या वर्षी रक्तदानाच्या दानयज्ञात मोठे योगदान दिले होते. यंदाही न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी लोकांना रक्तदानासाठी आवाहन केले आहे. ‘सध्या रक्तदान वाहिनीचा आभाव असल्याने रक्तदानाला तितकासा वेग मिळाला नाही. परंतु त्यावरही तोडगा काढण्यासाठी जे. जे. रुग्णालयासोबत चर्चा करणार असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले.’ रोज शेकडो लोक न्यासाकडे रक्तदानासाठी नोंदणी करीत आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. यापैकी १२८ जणांनी बुधवारी रक्तदान केले असून, ५०० हून अधिक लोकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑनलाइन नोंदणीचा पर्यायही दिलेला असून येत्या काळात दात्यांच्या परिसरात जाऊन ‘रक्तदान’ मोहीम राबविण्याचा मंदिर न्यासाचा मानस आहे.   धारावीतील तरुणांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे. ‘युवा तरंग’ या संस्थेने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाशी समन्वय साधून परिसरातील गणेश मंडळे, मंदिर समिती यांना एकत्र आणून रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. ‘सध्या शीव रुग्णालयात रक्ताची अधिक गरज आहे. धारावीतील लोकांना या रुग्णालयाचा फार मोठा आधार आहे. त्यात लसीकरणानंतर तरुणांना रक्तदान करता येणार नसल्याने, येत्या ९ मे रोजी हे शिबीर आयोजित केले आहे. जास्तीत जास्त रक्त रुग्णालयाला उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे,’ असे संस्थेचे नागेश कांबरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने, सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून ही शिबिरे आयोजित के ली जात आहेत. यामध्ये उत्सव मंडळांनीही मोठा पुढाकार घेतला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, वडाळा, लालबाग, गिरगाव, घाटकोपर येथील अनेक उत्सव मंडळे, तसेच  जी.एस.बी. सेवा मंडळाकडून हा दानयज्ञ सुरू आहे.

लस घेतल्यानंतर किमान २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे दोन मात्रांमध्ये तब्बल ५२ दिवसांचा कालावधी जातो. उद्या तरुणांचे लसीकरण सुरू झाले तर रक्ताचा तुडवडा पडू शकतो, कारण सर्वाधिक रक्तदाते त्याच वयोगटातील असतात. म्हणून सरकारने जनतेला केलेल्या आवाहनानंतर मोठय़ा संख्येने तरुण पुढे येत आहेत. विविध पक्ष, उत्सव मंडळे, संस्था आमच्याशी समन्वय साधत आहेत. १०० रक्तदात्यापैकी ८० दाते ते १८ ते ४० वयोगटातील आहेत. त्यामुळे तरुणांचा यात मोठा वाटा आहे.

– उत्पला हेगडे, जनसंपर्क अधिकारी, जे. जे. महानगर रक्तपेढी