रक्तद्रव (प्लाझ्मा) दानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आता सिनेकलाकार पुढाकार घेत आहेत. अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी यांनी करोनामुक्त झाल्यानंतर शुक्रवारी नायर रुग्णालयात रक्तद्रव दान केले.

२००८ साली प्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेत गाजलेली जोडी गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिका बॅनर्जी यांना ३० सप्टेंबरला करोनाची लागण झाली होती. गृह विलगीकरणाचा काळ त्यांनी पूर्ण केला. करोनामुक्त झाल्यावर त्यांनी रक्तद्रव दान करण्याचा निर्णय घेतला.

सिनेकलाकारांनी अशारीतीने पुढाकार घेल्यास त्यांचे चाहतेही रक्तद्रव दानासाठी पुढे येतील, असे रक्तपेढी प्रमुख डॉ. विकास कविश्वर यांनी सांगितले.

दरम्यान, नायर रुग्णालय आता राज्याच्या प्लाटिना रक्तद्रव उपचार चाचणीमध्ये सहभागी झाले असून, यात २५ गंभीर रुग्णांना रक्तद्रव उपचारही दिले आहेत, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.