13 December 2017

News Flash

खासगी रुग्णालयांतील रुग्णांची रक्तासाठी वणवण

शिबिरे घेत नसल्याने अत्यल्प रक्तसंकलन

मीनल गांगुर्डे, मुंबई | Updated: June 20, 2017 3:54 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शिबिरे घेत नसल्याने अत्यल्प रक्तसंकलन

राजावाडीसारख्या पालिका वा सरकारी रुग्णालयांतील रक्ताचा अपव्यय होत असताना मुंबईतील खासगी रुग्णालयांत मात्र रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. परवानगी असतानाही खासगी रुग्णालये चालवणाऱ्या विश्वस्त मंडळांकडून रक्तदान शिबिरे घेण्यात येत असल्याने या रुग्णालयांत अत्यल्प प्रमाणात रक्तसंकलन होते. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१६ साली विलेपार्लेतील नाणावटी रुग्णालयातील ७९ टक्के रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त शोधण्यासाठी पायपीट करावी लागली आहे.

२००२ साली लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रक्त धोरणानुसार विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांनी त्यांच्या गरजेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील ३६ विश्वस्त संस्थांच्या रुग्णालयांना रक्तदान शिबिरे घेता येतात. मात्र असे असतानाही मुंबईतील अनेक विश्वस्त संस्थांची रुग्णालये आवश्यकतेपेक्षा कमी रक्तदान शिबिरे आयोजित करतात, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या २०१६ च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये नाणावटी, सैफी, प्रिन्स अली खान, एस. एल. रहेजा या नामांकित रुग्णालयांचा समावेश असून येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांची रक्ताची गरज भागविण्याकरिता बाहेरचे रक्तदाते किंवा रक्तपेढीवर अवलंबून राहावे लागते आहे. या रुग्णालयांतील रुग्णांच्या नातेवाइकांनाच रक्त वा रक्तदाता आणण्याची सूचना दिली जाते. राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार या चारही रुग्णालयातील बहुसंख्य रुग्णांना गेल्या वर्षी बाहेरून रक्तदाता किंवा रक्ताची गरज भागवावी लगली होती.

रुग्णालये म्हणतात..

नाणावटी रुग्णालयात गेले ३० वर्षांपासून थेलिसेमियाचे ३० रुग्ण आहेत. त्यांना दर दोन आठवडय़ांत रक्त द्यावे लागते. तर अनेकदा आम्ही दुसऱ्या रक्तपेढय़ांना रक्ताचा पुरवठा करतो, असे नाणावटी रक्तपेढीच्या प्रमुख रिकू भाटिया यांनी सांगितले. तर एल.एस.रहेजा रुग्णालयातील रक्तपेढीत रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तदान करण्यास डॉक्टर व परिचारिकांकडून प्रोत्साहन दिले जाते, असे या रक्तपेढीच्या प्रमुख नीलम निझारा यांनी सांगितले. हीच प्रक्रिया सैफी रुग्णालयातही राबविली जाते, असे या रक्तपेढीच्या प्रमुख आयनी झुनिया यांनी सांगितले.

अपघातात रुग्णाला मोठय़ा प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. त्याशिवाय थेलिसेमिया, कर्करुग्ण आणि प्रसूतीदरम्यानही रक्ताची निकड भासते. या वेळी ही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांना कुठूनही रक्त घेऊन या, असे सांगतात. अशा प्रसंगी घाबरलेले नातेवाईक रक्तासाठी जंग जंग पछाडतात. अशा रुग्णालयांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने कारवाई करायला हवी.  विनय शेट्टी, संस्थापक, थिंक फाऊंडेशन

रक्तासाठी दाहीदिशा

  • राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार २०१६ साली नाणावटी रुग्णालयात ४७३५ युनिट रक्त लागले. यातील केवळ १०१८ युनिट रक्त वर्षभरात आयोजित केलेल्या आठ रक्तदान शिबिरांतून आणि ऐच्छित रक्तदानातून जमा करण्यात आले होते. उरलेले ३७१७ युनिट रक्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून मागविण्यात आले.
  • सैफी रुग्णालयात वर्षभरात ३८१४ युनिट रक्ताचा वापर करण्यात आला. त्यांनी वर्षभरात आयोजित केलेल्या २४ रक्तदान शिबिरातून २१३१ युनिट रक्त जमा झाले. यानुसार सैफी रुग्णालयात वर्षांला ५५.८७ टक्के वैयक्तिक रक्तदान झाले असून उरलेले ४५ टक्के रुग्णांना बाहेरून रक्त आणावे लागले.
  • प्रिन्स अली खान रुग्णालयात २५ टक्के, एस.एल.रहेजा रुग्णालयात २८ टक्के रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त आणावे लागले.

First Published on June 20, 2017 3:54 am

Web Title: blood scarcity in private hospital