15 August 2020

News Flash

रक्तासाठी वणवण

आजही अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना अपेक्षित रक्त मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

सात खासगी रुग्णालयांना नोटिसा; रक्त संक्रमण परिषदेच्या नियमांची पायमल्ली

रुग्णालयांमध्ये जाणवणारी रक्ताची चणचण व रक्त मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी करावी लागणारी वणवण थांबावी, यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनांकडे मुंबईतील अनेक रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना अपेक्षित रक्त मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने मुंबईतील सात खासगी रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या आहेत.

२००२ साली लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय रक्त धोरणानुसार धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या गरजेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील ३६ धर्मादाय रुग्णालयांना रक्तदान शिबिरे घेता येतात. मात्र असे असतानाही मुंबईतील अनेक धर्मादाय रुग्णालये आवश्यकतेपेक्षा कमी रक्तदान शिबिरे आयोजित करतात. या वर्षी जून महिन्यात नानावटी, सैफी, प्रिन्स अली खान, एस. एल. रहेजा या नामांकित रुग्णालयांतील रुग्णांची रक्ताची गरज भागविण्याकरिता बाहेरचे रक्तदाते किंवा बाहेरील रक्तपेढीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे उघड झाले होते. याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेने या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांत मुंबईतील सात रुग्णालयांमध्ये रुग्णांची वणवण सुरूच असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. तीन महिन्यांत सैफी रुग्णालयात ९३३ युनिट रक्त रुग्णांकडून  घेण्यात आले. ग्लोबल रुग्णालयात ६०३, पी.डी.हिंदुजा ४१६, रहेजा  ४३६ युनिट रक्त रुग्णांकडून मागविण्यात आले.

रक्त संकलनाचा अभाव

धर्मादाय रुग्णालयांना रक्तशिबिरांची परवानगी असतानाही ही रुग्णालये शिबिरे घेत नाहीत. या शिबिरांसाठी मनुष्यबळ आणि खर्च जास्त होत असल्याने अनेकदा रुग्णालये रुग्णालयांच्या आवश्यकतेनुसार शिबिरे न घेता सार्वजनिक रक्तपेढय़ांकडून किंवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्ताची मागणी करतात, असे परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढय़ांची संघटना ‘फेडरेशन ऑफ बॉम्बे ब्लड बँक (एफबीबीबी)’ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नियम काय?

राष्ट्रीय रक्त धोरणानुसार, २००२ आणि २००७ नुसार रुग्णालयांनी आपल्या आवश्यकतेनुसार शिबिरे आयोजित करून रुग्णालयात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्ताची मागणी न करता रुग्णालयांनी आपल्या जबाबदारीने रक्त उपलब्ध करणे बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2017 2:24 am

Web Title: blood scarcity issue blood shortage
Next Stories
1 नियम डावलून मोजोमजा
2 ‘केक’चा बाजार तेजीत
3 कमला मिल दुर्घटनेची सीबीआय चौकशी करा!
Just Now!
X