* आश्वासन देऊनही ‘माई मंगेशकर भवना’साठी आर्थिक मदत नाही!
*  सभागृहावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता
मंगेशकर कुटुंबीयांनी आश्वासन देऊनही साह्य़ न केल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे जन्मस्थान असलेल्या  इंदूर येथील माई मंगेशकर सभागृहावर आता जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. मराठा समाज या संस्थेने या सभागृहाच्या उभारणीसाठी ज्येष्ठ गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या संमतीने बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते आम्ही देऊ, असे आश्वासन हृदयनाथ यांनी त्या वेळी दिले होते. परंतु त्या आश्वासनालाही हरताळ फासण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जप्तीच्या संकटातून सुटण्यासाठी संस्थेने आता इंदूरमधील मराठी समाजापुढे हात पसरण्याचे ठरविले आहे.
संस्थेच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक बैठकीत या विषयाचे जोरदार पडसाद उमटले. या सभागृहाच्या उभारणीसाठी कार्यक्रम करण्याचे आश्वासन देऊनही आजतागायत लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबीयांकडून कार्यक्रम केला गेला नसल्याप्रकरणी या बैठकीत सभासदांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच जप्तीची कारवाई टाळण्यासाठी पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबीयांकडे पाठपुरावा करण्याचे, कर्जफेडीसाठी आणखी काही मुदतवाढ देण्याची विनंती बँकेला करण्याचे आणि इंदूर येथील मराठी समाजाकडून देणगीच्या माध्यमातून पैसे उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आपल्या आईच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या सभागृहासाठी जाहीर कार्यक्रमाद्वारे आर्थिक मदत करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न करून मंगेशकर कुटुंबीयांनी आमच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप इंदूर मराठी समाज संस्थेचे सचिव चंद्रकांत पराडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
मंगेशकर कुटुंबीयांचे इंदूरशी जुने ऋणानुबंध असल्याने आम्ही माई मंगेशकर यांच्या नावाने बंदिस्त सभागृह बांधण्याचे ठरवले. या संदर्भात दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानकडून संस्थेला लेखी पत्रही प्राप्त झाले. आपले संकुलाचे नव्वद टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचा वास्तुविशारदांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या कार्याच्या मदतीसाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा एक संगीताचा कार्यक्रम इंदूर येथे देण्यास लतादीदींनी अनुमती दिलेली आहे. तसे लेखी आश्वासन प्रतिष्ठानकडून संस्थेला २० मे १९९९ रोजी मिळाले होते. हृदयनाथ मंगेशकर यांनीही, या सभागृहाच्या निर्माणकार्यात सहयोग देऊ, असे लेखी आश्वासन दिले होते. २००१ ते २००३ या कालावधीत मंगेशकर कुटुंबीयांकडे मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र मंगेशकर कुटुंबीयांकडून कार्यक्रम करण्याविषयी काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे पराडकर यांनी सांगितले.
हृदयनाथ मंगेशकर हे २००३ मध्ये इंदूर येथे आले असता, बँकेकडून कर्ज घेऊन, आम्ही काम सुरू करावे का, अशी विचारणा संस्थेचे पदाधिकारी आणि विश्वस्तांनी त्यांना केली. तेव्हा, तुम्ही कर्ज घ्या, आम्ही हप्त्यांची रक्कम पाठवू, असे त्यांनी सांगितले. त्यावर संस्थेने छत्रपती सहकारी बँकेकडून ३४ लाखांचे कर्ज घेतले. नऊशे आसन क्षमता असलेले हे सभागृह आता तयार झाले आहे. सभागृहाच्या बांधणीसाठी सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्च झाले. आता बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर ५५ लाख रुपयांपर्यंत गेला आहे.
दरम्यान, या संदर्भात लता आणि हृदयनाथ मंगेशकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.