पाणीपट्टी थकविणाऱ्या नागरिकांकडून अभय योजनेअंतर्गत १३८ कोटींची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. अभय योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून या योजनेला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या जलदेयकांचा भरणा जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक आहे. एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर दर महिन्याला दोन टक्के अतिरिक्त आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकारामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाते. या थकबाकीबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी पालिकेने दिनांक १५ फेब्रुवारी, २०२० पासून ‘अभय योजना २०२०’ सुरू केली होती. या योजनेला मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहून योजनेला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.

३०.५५ कोटींची सूट..

३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ५६ हजार ९६४ जलजोडणीधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत जलजोडणी-धारकांकडून १३८.१९ कोटी रुपयांचा भरणा  महापालिकेकडे करण्यात आला आहे. तर महानगरपालिकेद्वारे देखील तब्बल ३०.५५ कोटी रुपयांची सूट जलजोडणीधारकांना देण्यात आली.