केंद्र सरकारने गोवंशहत्या बंदी केल्यानंतर अनेक ठिकाणी सोडून दिलेल्या बेवारस गायी मोकाट फिरताना दिसू लागल्या असून मुंबईतही अशा गाईंची संख्या वाढू लागली आहे. या गाईंच्या पालनपोषणासाठी विकास आराखडय़ात गोशाळांसाठी भूखंड आरक्षित ठेवण्याचा ठराव पालिका सभागृहात शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या बेवारस गाईंना आसरा मिळणार आहे.
केंद्र सरकारने गोवंशहत्या बंदी केल्यानंतर त्याची मुंबईत अंमलबजावणी सुरू झाली आहे. पूर्वी दुभत्या गाईंचे मालक मंडळी मोठय़ा आस्थेने पालनपोषण करीत होते. परंतु दुध देईनाशी झालेल्या गायीला कसायाकडे सोपवून ते मोकळे होत असत. परंतु आता गोवंश हत्या बंदी केल्यामुळे अशा गाई मोकाट सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. आजघडीला मुंबईत अशा पाच हजारांहून अधिक गाई रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.