नाल्यांच्या रुंदीकरणात अडथळा आणणाऱ्या बांधकामांवर महानगरपालिकेने कारवाई सुरूच ठेवली असून गोवंडी येथील रफीकनगरमधील झोपडय़ा तोडण्यात आल्या. या झोपडय़ांमुळे रफीकनगर नाला रुंदीकरणाचे काम अनेक वर्षे प्रलंबित होते. एम पूर्व विभागाकडून पाहणी करून पात्रता निश्चित केल्यानंतर झोपडय़ा रिकाम्या करण्यात आल्या. त्यानंतर ८२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नाल्यावरील अनधिकृत झोपडय़ा पाडल्याची माहिती साहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. या कारवाईमुळे रफीकनगर नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पावसाळ्याअगोदर पूर्ण होईल. त्यामुळे एम पूर्व विभागातील अहिल्याबाई होळकर मार्ग तसेच शिवाजीनगर बस आगाराजवळील परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास व पर्यायाने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.