दिवसभरात १५० फेरीवाले हटविले; पालिकेची धडक मोहीम
पदपथांवर अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टॉल्सविरुद्ध पालिकेने गुरुवारपासून धडक मोहीम हाती घेतली. वरळी, दादर आदी भागात दिवसभरात तब्बल १५० स्टॉल्सविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर पदपथांवरील अतिक्रमणेही या वेळी हटविण्यात आली. या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडरही जप्त करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेने गुरुवारी काकासाहेब गाडगीळ रोड, सेनापती बापट मार्ग, हाजी अली, शिवाजी पार्क, दादर (प.) रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी रस्त्यावर अन्नपदार्थ बनवून विकणाऱ्या फेरीवाले आणि स्टॉल्सविरुद्ध कारवाई केली. गुरुवारी सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वडापाव, पाणीपुरी, चायनीज पदार्थाचे स्टॉल्स या कारवाईत तोडण्यात आले. पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर आणि जी-दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस संरक्षण न घेताच पालिकेने ही कारवाई केली. पालिकेच्या सुमारे ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

गॅस सिलिंडरबाबत चौकशीची मागणी
गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या स्टॉल्स आणि फेरीवाल्यांकडून पालिकेने मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडर आणि भांडी जप्त करण्यात आली, असे रमाकांत बिरादर यांनी सांगितले. अनधिकृत फेरीवाल्यांकडे मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडर सापडले असून त्यांना ते मिळाले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.