एका कारखान्यावर जप्ती, चार कारखान्यांना नोटीस
दूषित बर्फामुळे पसरणारे आजार टाळण्यासाठी पालिकेने कारवाई करून शहरातील १३पैकी ५ बर्फ कारखान्यांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत. यातीलच एका कारखान्यांवर जप्तीचीही कारवाई करण्यात आल्याची माहिती सोमवारी पालिका आरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यात केलेल्या पाहणीत फेरीवाले व दुकानदारांकडीलही ९२ टक्के बर्फात इ कोलाय हे पोटदुखी पसरवणारे जीवाणू आढळले. मासे, दूध, भाज्या असे नाशिवंत पदार्थ साठवण्यासाठीचा बर्फ मुंबईकरांना थंड पेय, आइस्क्रिममधून मिळत असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले होते. या वृत्तानंतर आरोग्य समितीच्या बैठकीत नगरसेविका डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा काढून दूषित बर्फासंबंधीच्या कारवाईची माहिती विचारली.
शहरात १३ बर्फ कारखाने असून परवाने देतानाच पालिकेच्या जलवाहिनीची जोडणी आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे या कारखान्यांनी पालिकेचे पाणी वापरूनच बर्फ तयार करणे अपेक्षित होते. मात्र काही कारखाने तसे करत नसल्याचे तपासणीत आढळले. पालिकेच्या इतर नियमांचेही उल्लंघन झाले होते. त्यामुळे अशा पाच कारखान्यांविरोधात परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातीलच पी उत्तर विभागातील शंकुंतला बर्फ कारखान्याला आधीही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या कारखान्याकडून त्यानंतरही नियमांचे उल्लंघन केले गेल्याने त्यांच्यावर जप्तीची कारवाई झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर चार कारखाने अंधेरी भागातील आहेत.